|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » थिबा संगीत महोत्सवात उभरते हिरेही रसिकांच्या भेटीला!

थिबा संगीत महोत्सवात उभरते हिरेही रसिकांच्या भेटीला! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

थिबा राजवाडा कला संगीत महोत्सव म्हणजे रत्नागिरीकरांसाठी संगीताची मेजवानीच जणू! गेल्या नऊ वर्षात अनेक जगद्विख्यात कलाकारांनी या महोत्सवाला उंची मिळवून दिली आहे. दिग्गजांसह युवा कलाकारांनीही या स्वरमंचावर आपली कला सादर करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. यावर्षी देखील महान कलाकारांच्या जोडीने संगीत क्षेत्रातले उभरते हिरे या महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

28 जानेवारी रोजी भरतनाटय़ कलाकार दाम्पत्य वीरजा मांढरे आणि श्यामजीत किरण महोत्सवाच्या दुसऱया दिवसाची सुरुवात करणार आहेत. या दोघांनीही चेन्नई येथील कलाक्षेत्र फाऊंडेशन येथून भरतनाटय़म्मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. कलेप्रती प्रामाणिकपणा आणि अफाट मेहनत याच्या जोरावर या दोघांनीही दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. गुरू व्ही. पी. धनंजय यांच्या भास्कर या संस्थेमधून भरतनाटय़म्चा डिप्लोमा प्राप्त केला आहे. तर वीरजा नृत्याव्यतिरिक्त ’योगविद्या गुरुकुल’च्या मान्यताप्राप्त योगगुरु आहेत. हे दोघेही दूरदर्शन चे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. रोटरी फाऊंडेशन च्या एका प्रकल्पाच्या माध्यमातून हे दोघेही दिव्यांग मुलांना नृत्याचे धडे देत आहेत. गुरू बालकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनीही कथकलीचेही धडे गिरवले आहेत.

भारतीय शास्त्राrय संगीताच्या प्रभावाने प्रेरित झालेले आणि संतुरच्या प्रेमात पडलेले जपानी कलाकार संतूरवादक ताकाहिरो आराही हे यावर्षीचे आणखी एक आकर्षण! 29 जानेवारी अर्थात महोत्सवाच्या तिसऱया दिवसाची सुरुवात ताकाहिरो करतील. वयाच्या 16 व्या वर्षी पाश्चिमात्य ड्रम पासून सुरुवात केलेला हा प्रवास त्यांना हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताकडे घेऊन आला. वयाच्या 26व्या वर्षी शिवकुमार शर्मा यांचे शिष्य सेत्सुओ मियाशीता यांची जपानमध्ये झालेली संतूर वादन मैफल त्यांनी पाहिली आणि ते संतूरकडे आकर्षित झाले. सुरवातीचे शिक्षण मियाशीता यांच्याकडून घेतल्यानंतर त्यांनी 2007 मध्ये भारत गाठला. आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्यत्व पत्करले. आता भारत तसंच जगभरातील पंडितजींच्या मैफिलीला ताकाहिरो यांची शिष्य म्हणून साथ असते. भारतातील अनेक मनाच्या महोत्सवांमधून त्यांनी संतूर वादन पेश केलं आहे.

9 फेब्रुवारी रोजी दशकपूर्ती सोहळा होणार आहे. याची सुरुवात बासरीवादक भगिनी सुचिस्मिता आणि देवोप्रिया चॅटर्जी करणार आहेत. हिंदुस्थानी शास्त्राrय गायक दाम्पत्य रॉबिन आणि कृष्णा चॅटर्जी यांच्या या बासरीवादक कन्या! आईवडिलांकडून मिळालेलं संगीताचं बाळकडू जपत पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडून बासरी शिकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांचं शिष्यत्व पत्करलं. उच्च विद्या विभूषित तसेच अभिजात भारतीय संगीत आणि विश्वसंगीत यांची उत्कृष्ट सांगड त्यांच्या सादरीकरणात झळकते. संगीत प्रभाकर अर्थात पदवी आणि संगीत प्रवीण अर्थात पदव्युत्तर शिक्षण या संपूर्ण प्रवासात दोघींचीही कारकीर्द उज्ज्वल आहे.

सभासदत्वासाठी आर्ट सर्कलचे आवाहन

27 ते 29 जानेवारी या दरम्यान सादर होणारे हे सर्व कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता सुरु होतील. अजूनही ज्यांनी सभासदत्व कार्ड घेतली नाहीत त्यांनी निराशा टाळण्यासाठी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आर्ट सर्कल तर्फे करण्यात आले आहे.

 

 

Related posts: