|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज

निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती

कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई / प्रतिनिधी

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष पूर्ण ताकदीने लढेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. आम्ही जिल्हाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवारांची नावे मागवली आहेत. तसेच काही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. पक्ष कार्यकारिणीच्या पुण्यात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार निवडणुकीत  स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या संदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दाखवली होती. परंतु, काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मुंबईसाठी आम्हाला नाईलाजाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करावी लागली. या निवडणुकीत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे. काँग्रेस पक्ष मोठा असल्याने आघाडीबाबत निर्णय घेऊन त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही तटकरे म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या दुसऱया यादीबाबत पक्षाचे प्रभारी जयंत पाटील, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चर्चा सुरू आहे. पुढील आठवडय़ात दुसऱया यादीबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष रेखाताई फड, भारिप-बहुजन महासंघाचे दिलीप मुळे, भारिपचे बुलढाणा जिल्हय़ाध्यक्ष दिलीप खरात आदींनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, आमदार संजय कदम, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते.

Related posts: