|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » …इथे ओशाळली माणुसकी!

…इथे ओशाळली माणुसकी! 

राजेंद्र शिंदे / चिपळूण

चिपळूण-कराड रस्त्यावर खेर्डीत फिरणारी एक वेडसर व्यक्ती, जी ऊन असो वा पाऊस वा हुडहुडी भरवणारी थंडी असो त्यातून दिवस कंठणारी.. त्याला नाव नव्हते, गाव नव्हते, पण गेली दहा वर्षे त्याचे येथे वास्तव्य होते. जरा वेडसर असला तरी कुणाला दगड मारत नव्हता ना कुणाला त्रास देत होता खरं तर तो बिचारा तो बोलतही नव्हता. चार दिवसांपूर्वीच त्याला एका बसने जोरदार धडक दिले, रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या या व्यक्तीला रूग्णवाहिका मागवून कामथे रूग्णालयात नेण्यात आले. मात्र बेवारस म्हणून उपचार करण्यास नकार दिल्याने त्याला पुन्हा परत आणले गेले. अखेर तडफडत त्याने मृत्यूला कवटाळले. आजही त्याचा देह कामथेच्या शवागारात बेवारस म्हणून पडून आहे. मात्र त्याच्या जाण्याने सारेच हेलावून गेले आहेत.

त्याला सर्वजण फरीदा अशी हाक मारत. ही व्यक्ती कोण, कुठला, गेल्या दहा वर्षात कुणाला माहित नव्हते… आजही नाही. खेर्डीतील युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांचे संगम हॉटेल ते बाजारपेठ हा त्याचा दिवसभराचा प्रवास असे. दिवसा त्याला खेर्डीतील एखादा दुकानदार खाण्यासाठी काही देत असे तर कुणी टपरीवाला चहा देत असे. संगम हॉटेलमधील खाद्यपदार्थ मात्र त्याला न चुकता दिले जात असत. सकाळी चहा, दुपारी जेवण परत सायंकाळी चहा व रात्री जेवण असा त्याचा तेथील नित्यक्रम असे. हॉटेलशेजारी असणारे दुकानदार बाबा मगदूम हे तर त्याला कपडे व जेवणही देत असत. मगदूम त्याला स्वतःच्या घरच्यासारख सांभाळत होते. मात्र या कोणालाच त्याच्या पूर्वायुष्याची जराशीही माहिती नव्हती.

नियतीचा खेळही खूप अजब आहे. एखाद्या वेळी पावसात भिजलो तरीही आपण आजारी पडतो, पण हा फरीदा मात्र अनेक वर्षे पावसाळा अंगावर काढत असे. आजारी पडलो तर आपण वैद्यकीय उपचार घेऊ शकतो. आपल्याकडे पैसा आहे आपण बोलू शकतो, पण परमेश्वराने त्याला यातील काहीच दिले नसल्याने तो बिचारा सर्व त्रास सहन करत वर्षे ढकलत होता. चार दिवसांपूर्वीची रात्र मात्र त्याच्यासाठी काळरात्र ठरली आणि तिथे मात्र तो हरला.

रात्री 11.30 च्या दरम्यान खेर्डी मच्छी मार्केट येथे अज्ञात बसने त्याला उडवले. दुर्दैवाने तो अनाथ होता गरीब आणि वेडा होता म्हणून तिथे कोणीही त्याला वाचवण्यासाठी आले नाही. बिचाऱयाला बोलता येत नव्हतं, तो वेदनेने तडफडत होता, पण त्याच्याजवळ मदतीसाठी कोणीही नव्हते. याचवेळी समोरच्या गॅरेजवाल्यांनी बाबा मगदूमला या बाबत कळवले. मगदूम त्याला फरीदा अशी हाक मारत होते. त्यांना ही घटना समजताच ते जेवण सोडून धावत गेले पाहतात तर फरीदा रस्त्यावर पडला होता. लोक जमले होते, पण कुणीच मदत करत नव्हते. शेवटी बाबांनी 108ला संपर्क साधल्यानंतर रूग्णवाहिका मागवली. त्यामध्ये फरीदाला भरून स्वतः कामथे रूग्णालयात घेऊन गेले. तेथे गेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. उलट डॉक्टरांनी आपण त्याचे कोण आहात, असे विचारल्यावर बाबांनी सांगितले मी माणूस असून मी माणुसकी म्हणून त्याला घेऊन आलो आहे. तरीदेखील डॉक्टरांनी फरीदाला दाखल करून घेण्यास नकार देत परत पाठवले. नाईलाजाने मगदूम फरीदाला घेऊन घरी आले. पहाटे 4.30 वाजता उपचाराविना राहिलेल्या फरीदाने मृत्यूला कवटाळले. आपल्यासमोरच फरीदाला समोर वेदनेने तडफडताना पाहून मगदूम यांच्या डोळ्य़ातील अश्रू थशंबत नव्हते.

अनाथ असल्यामुळे कामथे रूग्णालयाने त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. जर उपचार झाले असते तर एक अनाथ आज वाचला असता. फरीदाच्या मृत्यूची पोस्ट गेल्या 2 दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्याच्या मृत्यूच्या कहाणीने सारेच हेलावून गेले आहेत. रुग्णालयाच्या या भूमिकेबद्दलही नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बेवारस माणसांनी उपचाराविनाच मरावे, अशी कोणती तरतूद रुग्णालयाने शोधली, असा संतप्त प्रश्नही नागरिक विचारत आहेत. आज बेवारस म्हणून ‘फरीदा’चा देह रूग्णालयाच्या शवागारात पडून आहे. चार दिवस वाट पाहून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असे रूग्णालयाने स्पष्ट केल्याचे युवा सेना तालुकाप्रमुख खताते यांनी सांगितले.

 

Related posts: