|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आठ वाहनचालकांना ‘स्पीड गन’चा दणका

आठ वाहनचालकांना ‘स्पीड गन’चा दणका 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

वेगवाने वाहने चालवणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी स्पीड गनच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. बुधवारी 11 जानेवारीला टीआरपी येथे अचानक लावलेल्या तपासणीमध्ये आठजणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 8 हजार रुपये दंड वसूल केला गेला. रत्नागिरी शहरात वेगमर्यादेची माहिती देणारे फलक नसल्याने ‘स्पीड गन’द्वारे कारवाई करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

वाहतूक पोलीस निरीक्षक अयुब खान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचार, प्रसाराबरोबर ठिकठिकाणी तपासणी कार्यक्रम घेण्यात येत आहे. प्रबोधनासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिरे घेतली जात आहेत. बुधवारी सकाळी 11.30 वाजता टीआरपी येथे वाहतूक पोलिसांच्या पथकाने कारवाईला सुरवात केली. स्पीड गन उभी करुन प्रत्येक वाहनांचा वेग तपासला जात होता. या ठिकाणी वेगमर्यादा ताशी 40 कि.मी.ची होती. वाहतूक पोलिसांना पाहून अनेकांनी गाडय़ांचा वेग कमी केल्याचेही दिसत होते. गनच्या कचाटय़ात सापडलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. नियमाचे उल्लंघन करणाऱयांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होते. या कारवाईत आठजणांना स्पीड गनचा दणका बसला.

रत्नागिरी शहरात अनेक दुचाकी चालक वेगाने जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यावर अंकुश घालण्यात वाहतूक पोलिसांना शक्य होत नाही. त्यासाठी ही स्पीड गन निश्चितच उपयुक्त ठरु शकते. परंतु रत्नागिरी शहरामध्ये वेगमर्यादा दर्शवणारे फलकच उपलब्ध नाहीत. परिणामी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा कसा उगारणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेगमर्यादेचे फलक लावण्याचे काम नगर परिषदेचे आहे. वाहतूक पोलीस आणि नगर परिषद यांनी संयुक्त विद्यमाने याची अंमलबजावणी करावयाची आहे. शहरात होणाऱया अपघातांना आळा घालण्यासाठी आणि धूमस्टाईल दुचाकी चालकांवर अंकुश लावण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांकडूनच बोलले जात आहे.

Related posts: