|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सेतू उभारणीसाठी 105 कोटी अनुदान

सेतू उभारणीसाठी 105 कोटी अनुदान 

प्रतिनिधी/ चिकोडी

चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीतील कृष्णा व दूधगंगा नदीवर नव्याने पाच मोठे सेतू उभारण्यासाठी 105 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दिली. एकसंबा येथे मंजुरीपत्राच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते.

खासदार हुक्केरी पुढे म्हणाले, कृष्णा नदीवरील कल्लोळी-येडूर, चिंचली, मोळवाड व जुगुळ-खिद्रापूर तसेच दूधगंगा नदीवरील भोज-कारदगा व मलिकवाड-दत्तवाड या गावात लहान सेतू आहेत. ते पावसाळय़ात पाण्याखाली जातात. परिणामी त्या मार्गावरील लहान सेतू पाण्याखाली जात असल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प होते.

सदर मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याने नव्याने मोठे सेतू बांधण्याची मागणी होती. त्याची दखल घेत अनुदान मंजूर करण्यासाठी आपण महसूल खात्याचे संसदीय सचिव आमदार गणेश हुक्केरी यांना संयुक्तपणे मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम खाते मंत्र्यांशी 30 जून 2015 व 6 जानेवारी 2016 असे दोनवेळा पत्रव्यवहार केला. नवे सेतू उभारण्यासाठी केआरडीसीएल व सीआरएफमार्फत अनुदान मंजूर करण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती. त्यानुसार 2015-16 साली सेतूंसाठी अनुदान मंजूर करण्यात आले असल्याचे खासदार हुक्केरी यांनी सांगितले.

चिकोडी तालुक्यातील येडूर-कल्लोळ गावादरम्यान 44.70  किलोमीटरमधून वाहणाऱया कृष्णा नदीवरील नव्या सेतूसाठी 25 कोटी रुपये, रायबाग तालुक्यातील चिंचली-मोळवाड गावादरम्यानच्या कृष्णा नदीवर नव्या सेतूसाठी 25 कोटी रुपये, अथणी तालुक्यातील जुगूळ-खिद्रापूर गावादरम्यान कृष्णा नदीवर नव्या सेतूसाठी 25 कोटी रुपये, चिकोडी तालुक्यातील भोज-कारदगा गावादरम्यान दूधगंगा नदीवर नव्या सेतूसाठी 10 कोटी रुपये, चिकोडी तालुक्यातील मलिकवाड-दत्तवाड गावादरम्यान दूधगंगा नदीवर नव्या सेतूसाठी 20 कोटी रुपये असे एकूण 105 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या मार्गावर नवे मोठे सेतू उभारण्यात आल्यानंतर वाहतूक सुलभ होण्याबरोबरच पादचाऱयांनाही सोयीचे होणार असल्याचे खासदार हुक्केरी यांनी सांगितले.

याप्रसंगी खिद्रापूरचे राजगौडा पाटील, संजय पाटील, बसवंत पाटील, कुलदीप कदम, शांतीनाथ मांजरे, राजू कोरे, सागर लडगे, जुगुळचे महेश पाटील, श्रेणिक अक्कोळे, सुधाकर गणेशवाडी, अनिल सुंके, काकासो पाटील, रावसाहेब अक्कोळे, अरुण गणेशवाडी यांच्यासह विविध गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: