|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » काँग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची भाजपची मागणी

काँग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची भाजपची मागणी 

राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देवतांच्या प्रतिमांमध्ये काँग्रेसचे निवडणूक चिन्ह दिसत असल्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गदारोळ निर्माण झाला आहे. भाजपने हा प्रकार म्हणजे आचारसंहिता उल्लंघन असल्याचे सांगत काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठवावे व राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तर उत्तर प्रदेशचे निवडणूक आयुक्त टी. व्यंकटेश्वर यांनीही राहुल यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला असून आपणही याबाबत तक्रार नोंदवली असल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांनी चार दिवसांपूर्वी काँग्रेसच्यावतीने आयोजित जनवेदना संमेलनामध्ये राहुल यांनी याबाबत टिपण्णी केली होती. ते म्हणाले होते, काँग्रेसचे निवडणूक चिन्ह आपल्याला शिवजी अर्थात शंकर तसेच गुरू नानक, बुद्ध, महावीर यांच्या प्रतिमांमध्ये दिसून येते. तसेच इस्लामबरोबरही जोडले होते. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह हिंदू, जैन, शीख सांप्रदायामध्येही दिसत असल्याचे म्हटले होते. यालाच भाजपने आक्षेप घेतला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार ही तक्रार करण्यात आली आहे. हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. या भाषणाची सीडीही भाजपने आयोगाकडे दिली आहे, असे भाजपचे वरिष्ठ नेते भुपेंद्र यादव यांनी सांगितले.

ते म्हणाले, हा सरळसरळ आचारसंहितेचा भंग आहे. राहुल आणि त्यांच्या पक्षाविरोधात निवडणूक आयोगाने कठोर व न्यायविहित कार्यवाही करावी. त्यांच्या या वक्तव्याचा परिणाम केवळ उत्तर प्रदेशच नव्हेतर अन्य दुसऱया राज्यांमध्ये जेथे निवडणूक होत आहे तेथील मतदारांवरही होऊ शकतो. हा प्रकार म्हणजे मतदारांवर धार्मिक प्रभाव पाडण्यासारखे असल्याचे यादव म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक आधाराने निवडणुकीत प्रचार करू नये, असे मार्गदर्शक तत्व मांडल्यानंतरही 100 वर्षांची परंपरा असल्याचे सांगणाऱया पक्षाने असे कृत्य करणे निश्चितच माफ करण्याजोगे नसल्याचेही यादव यांनी सांगितले. तसेच पक्षाने याबाबत इन्कार केलेला नसल्याने आचारसंहिता उल्लंघन असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त के. व्यंकटेश्वर यांनीही राहुल यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनीही याबाबत तक्रार नोंदवली आहे.

तथापि काँग्रेसचे नेते पी. एल. पुनिया यांनी मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. राहुल यांचे निवेदन म्हणजे केवळ काँग्रेसचे निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता. आणि चिन्हाबाबत जुळलेला भावनात्मक दृष्टीकोन त्यांनी दाखवून दिला आहे. यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related posts: