|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ऍट्रासिटी समर्थनात बहुजनांचा एल्गार

ऍट्रासिटी समर्थनात बहुजनांचा एल्गार 

प्रतिनिधी/ सातारा

आपल्या विविध न्याय्य, हक्क मागण्यांसाठी रविवारी साताऱयात विराट असा बहुजनांचा क्रांती मोर्चा निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकऱयांच्या पुतळयाला अभिवादन करुन मोती चौकामार्गे राधिका रस्त्याने एस.टी. स्टॅडमार्गे पोवईनाक्यावर हा मोर्चा आला. कडक पोलीस बंदोबस्त, वाहतुकीमध्ये केलेले बदल या सर्व वातावरणात मोठय़ा संख्येने निळे झेंडे खांद्यावर घेवून घोषणाबाजी करत संविधान के सन्मान में हम सभ मैदान मैं, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो… शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणांनी पोवईनाका परिसर दुमदुमून गेला होता. सुमारे दहा ते पंधरा हजारांचा जमाव या मोर्चाला उपस्थित होता.

दुपारी बारा वाजता सुरु झालेला मोर्चा पोवईनाका येथे दुपारी एक वाजेपर्यंत पोहचला. या मोर्चात अनेक तरुणांनी डोक्याला निळा फेटा, गळयात निळे तमलपत्र व हातात निळा झेंडा घेतला होता. तर महिलांनी मुलींनी पांढऱया साडय़ा परिधान केल्या होत्या. त्यामुळे साताऱयात बहुजनांचे निळे वादळ घोंगावताना दिसत होते. कोठेही अनुचित प्रकार घडु नयेत म्हणुन पोलिसांनी मोर्चा मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतूक मार्गात ही बदल केले गेले होते.

वाहतूक व्यवस्थेत बदल

बहुजन क्रांती मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेवून सातारा शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले होते. मोळाचा ओढा येथुन येणारी अवजड वाहने करंजे नाक्यावर अडवली जात होती तर दुचाकी गाडय़ा करंजे येथून सोडल्या जात होत्या. राधिका रोडला हॉटेल सेनॉर येथे रस्ता अडवून वाहतूक ढोर गल्ली मार्गे सुरु होती तर भू विकास बँक जवळ वाहतूक अडवुन ती तावडे चौकातून वळवण्यात आली होती. तसेच पोवई नाक्यावर येणारे आठ ही रस्त्यावर बॅरेकेट्स लावून हे रस्ते अडवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना आपल्या दुचाकी चारचाकी गाडय़ा लावून चालत यावे लागत हेते.

अनेक वक्त्यांची ऍट्रॉसिटीवर भाषणे

आर. पी. आय.चे नेते अशोक गायकवाड, भटके विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजन समितीचे संघटक चिमन भालेराव, डॉ. अनिल माने, यासह दादासाहेब ओव्हाळ, उमेश चव्हाण, अमर गायकवाड आदी वक्त्यांची भाषणे झाली. यामध्ये जवळपास सर्वच वक्त्यांचा सूर
ऍट्रॉसिटीवर होता. यावेळी अशोक गायकवाड यांनी मराठय़ांनी रोटी-बेटी व्यवहार आमच्या बरोबर चालू करा ऍट्रॉसिटी आपोआप रद्द होईल त्यासाठी मोर्चा काढण्याची गरज नाही, असे ठणकावून सांगितले. पुर्वीपासून महार, मांग, चांभार, लोहार, कुणबी यांना गावकुसाबाहेर ठेवले. आमच्या स्त्रियांवर अन्याय केला. आम्हाला शिकु दिले नाही, आमचे शोषण केले. त्यामुळे बाबासाहेबांना दलितांच्या संरक्षणासाठी ऍट्रॉसिटी कायदा तयार करावा लागला असे सांगितले तर भटके विमुक्तांचे नेते लक्ष्मणराव माने यांनी महार-बौध्द समाजाने मोठय़ा भावाची भुमिका निभवावी व छोट-छोटे गट, जाती एकत्र कराव्यात तरच भविष्यात बहुजनांचा लढा मोठा होईल असे सांगितले.

तर बहुजन क्रांती मोर्चाचे संघटक चिमण भालेराव यांनी कोपर्डी येथील घटना दुदैवीच आहे परंतु खैरांजलीची घटना ही तेवढीच दुदैवी होती. मात्र मराठा समाजाने कोपर्डी प्रकरणासाठी रस्त्यावर उतरुन मोर्चे काढले पण खैरांजली प्रकरणात त्यांना असे करावे असे वाटले नाही हे मोठे दुदैव आहे. यापूर्वी अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, रायगड, पालघर, पुणे, वाशिम, नाशिक, यवतमाळ येथे हे मोर्चे काढण्यात आले होते. भविष्यात आणखी उर्वरित जिह्यात हे मोर्चे काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ज्यांना दलितांवर अन्याय करायची मनोमन इच्छा आहे अशातच ऍट्रॉसिटीची भिती वाटत आहे. विनाकारण या कायद्याची भिती वाटण्याची गरजच काय ? यावेळी चिमण भालेराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांना पुरंदरे यांचा पुरस्कार मागे घ्या ही मागणी तुमच्या निवेदनातुन काढून टाका आम्हीं ऍट्रोसिटीच्या मागणीच्या विचार करु असे सांगितले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. परंतु ऍट्रोसिटी रद्द करणे फडणवीस सरकारच्या हातात नाही हे मराठा समाजाने लक्षात घ्यावे असे ही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी विविध दलित संघटनांचे नेते, मुस्लीम समाज, चर्मकार समाज, जैन समाज, यांसह विविध छोटय़ा मोठया जातीचे नेते सभामंडपात हजर होते.

Related posts: