|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » हार्बर मार्गाचे विस्तारीकरण मार्चपर्यंत पूर्ण

हार्बर मार्गाचे विस्तारीकरण मार्चपर्यंत पूर्ण 

अंधेरी ते जोगेश्वरीदरम्यान रेल्वे रूळ टाकणे, स्थानकांमध्ये बदल करण्याची कामे सुरू

मुंबई / प्रतिनिधी

मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील सीएसटीहून अंधेरीपर्यंत जाणाऱया गाडय़ा गोरेगावपर्यंत नेण्याच्या कामांना वेग आला असून अंधेरी ते गोरेगावदरम्यानचे हार्बर मार्गाचे विस्तारीकरण मार्च अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गात जोगेश्वरी येथील काही बांधकामांचा अडथळा येत होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर रेल्वेच्या बाजूने तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आता अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान रेल्वेरूळ टाकणे, जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव या ठिकाणी स्थानकांमध्ये बदल करणे आदी कामे सुरू करण्यात आले आहेत.

हार्बर मार्गावरील गाडय़ा सीएसटीहून अंधेरीपर्यंत येत असतात. या गाडय़ा बोरिवलीपर्यंत चालवण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होती. या मागणीचा विचार करून रेल्वेने सुरुवातीला हार्बर मार्गाचे विस्तारीकरण गोरेगावपर्यंत करण्याचे निश्चित केले. या कामाचा समावेश एमयुटीपी-2 या योजनेत करण्यात आल्यानंतर या कामाला गती मिळाली. पण जोगेश्वरी स्थानकाच्या दक्षिणेकडे असलेल्या काही बांधकामांमुळे हा विस्तार रखडला होता. जोगेश्वरी ते गोरेगाव या टप्प्यात या मार्गावर रेल्वेरूळ टाकण्याचे काम झाले आहे. आता अंधेरी ते जोगेश्वरी यादरम्यान रेल्वेरूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आदी कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले. हा मार्ग जोगेश्वरीच्या पुढे नेण्यासाठी जोगेश्वरी पश्चिमेकडे असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक एक थोडासा तोडावा लागणार आहे. सध्या हा प्लॅटफॉर्म होम प्लॅटफॉर्म आहे. पण हार्बर मार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर हा प्लॅटफॉर्म जोगेश्वरी पश्चिमेपासून तुटणार आहे.

दरम्यान, राम मंदिर, जोगेश्वरी (विस्तारीत स्थानक) आणि गोरेगाव या तीन स्थानकांमध्ये हार्बर मार्गाच्या प्लॅटफॉर्मची कामेही हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वे या मार्गावर गाडय़ा सुरू करण्याबाबत निर्णय घेईल, असेही सहाय यांनी स्पष्ट केले.

Related posts: