|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » दादरच्या जागेवरून सेना-भाजपमध्ये रस्सीखेच

दादरच्या जागेवरून सेना-भाजपमध्ये रस्सीखेच 

प्रभाग क्रमांक 191 वर भाजपचा दावा

किरीट सोमय्या यांच्या पत्नीला उमेदवारी?

महापालिकेचा रणसंग्राम

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच दादरच्या प्रभाग क्रमांक 191 वरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग 191 मधून शिवसेनेने माजी आमदार विशाखा राऊत यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. तर भाजपकडून खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.

शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱया किरीट सोमय्या यांच्या पत्नीसाठी दादरची जागा सोडायची नाही असा निर्धार शिवसेनेने केला आहे. त्यामुळे चर्चेपूर्वीच दादरच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

प्रभाग पुनर्रचनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदीप देशपांडे यांचा दादर पश्चिम येथील प्रभाग महिलांसाठी राखीव आहे. मनसेने येथून संदीप देशपांडे यांची पत्नी स्वप्ना यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेची निवडणूक लढवावी लागणार असल्याने स्वप्ना देशपांडे यांनी तहसीलदारपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या निवडणुकीत मनसेने दादर-प्रभादेवीमधील सात जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या सर्व जागा मनसेसाठी प्रतिष्ठेच्या आहेत.

मनसेला तोडीस तोड उमेदवार म्हणून शिवसेनेने दादरमधून माजी महापौर विशाखा राऊत यांचे नावे जवळपास निश्चित केले आहे. राऊत या 1997-98 मध्ये मुंबईच्या महापौर होत्या. तसेच 1999 मध्ये त्या दादरमधून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. महापालिका आणि विधानसभा कामकाजाचा अनुभव असलेल्या राऊत यांना दादरमधून संधी देऊन मनसेसमोर कडवे आव्हान उभे करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

भाजपचा मेधा सोमय्यांसाठी आग्रह का?

दादर हे मेधा सोमय्या यांचे माहेर आहे. मूळच्या ओक कुटुंबातील मेधा या ब्राह्मण असल्याने दादरमध्ये ब्राह्मण कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. किरीट सोमय्या हे गुजराती समाजाचे आहेत. त्यामुळे मेधा सोमय्या यांच्या निमित्ताने दादरमध्ये मराठी-गुजराती अशी मोट बांधण्याकडे भाजपचा कल आहे.

Related posts: