|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » जिल्हा परिषदेसाठी सेना-भाजपची मोर्चेबांधणी

जिल्हा परिषदेसाठी सेना-भाजपची मोर्चेबांधणी 

काँग्रेस-राष्ट्रवादी वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी

जिल्हा परिषदेचा मतसंग्राम

मुंबई / प्रतिनिधी

नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरी भागावरील पकड घट्ट केल्यानंतर शिवसेना आणि भाजपने आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ग्रामीण भागात जम बसवण्यासाठी दोन्ही पक्षांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी या निवडणुका ताकदीने लढण्याचे दोन्ही पक्षांनी ठरवले आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून सेना-भाजपने जिल्हा परिषदेची तयारी चालवली आहे.

राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांसाठी पुढील महिन्यात दोन टप्प्यात मतदान होत आहे. नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने ग्रामीण भागातील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. नगरपालिका निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या नेते, पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेऊन संबंधितांवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारी निश्चित केली.

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपचे जिल्हा परिषदांमध्ये फारसे अस्तित्व नाही. जळगाव आणि जालना जिल्हा परिषद वगळता अन्य ठिकाणी भाजपची स्थिती तोळामासा आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का दिला तर 2019 ची विधानसभा निवडणूक पक्षाला जड जाणार नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांना करून दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गेल्या आठवडय़ात ‘मातोश्री’वर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत ठाकरे यांनी प्रत्येक मंत्र्याला गावपातळीवर जाऊन प्रचार सभा घेण्याचे आदेश दिले. याशिवाय प्रत्येक मंत्र्यांवर दोन जिल्हा परिषदांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. मंत्र्यांच्या मदतीला आमदार आणि स्थानिक नेत्यांची कुमक देण्याचे ठाकरे यांनी ठरवले आहे. एरवी महापालिका निवडणुकीत जास्त रस दाखवणाऱया शिवसेनेनेही 2019 ची विधानसभा डोळय़ासमोर ठेवून ग्रामीण भागातील पाया पक्का करण्याचे ठरवले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ, पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायटय़ा आदींच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसने ग्रामीण क्षेत्रातील पाया मजबूत केला आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यापासून भाजपने ग्रामीण भागात हातपाय पसरायला सुरुवात केल्याची जाणीव झाल्यापासून दोन्ही काँग्रेस पक्ष सावध झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून नोटाबंदी, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा ग्रामीण भागावर झालेला परिणाम आदी मुद्दे हाती मतदारांसमोर मांडले जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेतील संख्याबळ

राष्ट्रवादी काँग्रेस…………..511

काँग्रेस…………………………419

शिवसेना………………………233

भाजप…………………………165

जिल्हा परिषदेवरील वर्चस्व

राष्ट्रवादी काँग्रेस : रायगड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, अमरावती, अहमदनगर

काँग्रेस : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर

शिवसेना : रत्नागिरी, हिंगोली, औरंगाबाद

भाजप : जळगाव आणि जालना

Related posts: