|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मॅनेजर आत्महत्येचे गूढ कायम

मॅनेजर आत्महत्येचे गूढ कायम 

प्रतिनिधी/ सांगली

कोल्हापूर जिल्हय़ातील हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याचे माजी अकौंटंट आणि सध्या फलटण येथील श्रीराम उद्योग समूहाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील गजानन पुजारी यांच्या आत्महत्येचे गूढ सोमवारीही कायम होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पाच पानी चिठ्ठीत अनेक बडया नेत्यांची नावे असल्याची चर्चा आहे. पण, पोलिसांनी चिठ्ठीतील नावे उघड करण्यास नकार दिला आहे. पण, चिठ्ठीतील नावांच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. दरम्यान, सांगली शहर पोलीस ठाण्याकडील  पथक चौकशीसाठी सोमवारी दिवसभर सातारा जिल्हयात तळ ठोकून होते.

   सुनील पुजारी हे इचलकरंजी येथील चिनार को-ऑप हौसिंग सोसायटीमध्ये राहण्यास होते. ते 13 जानेवारी रोजी सांगलीतील तृप्ती लॉजमध्ये उतरले होते. 14 जानेवारी रोजी त्यांनी लॉजमध्येच आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. लॉज मॅनेजर संतोष तुकाराम केरेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबतची वर्दी दिली असून त्यानुसार पोलिसात पुजारींच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. पण, त्यांनी आत्महत्येपूर्वी पाच पानी चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये आत्महत्येचा पर्याय निवडण्याची सर्व कारणे लिहिल आहेत. त्याचबरोबर आत्महत्येस कारणीभूत असणाऱया व्यक्तींचीही नावे त्यामध्ये समाविष्ट असल्याचे समजते. त्यांनी आपल्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱयांमध्ये सातारा जिल्ह्य़ातील एका बडय़ा राजकारण्यांसह अन्य काहींच्या नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे. पण पोलीसांनी तपास कामात अत्यंत गुप्तता पाळली आहे.

  पुजारी यांच्या आत्महत्येची नोंद करून पोलीसांनी चिठ्ठीतील मजकूर आणि नावांच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. शहर पोलिसांचे एक पथक दिवसभर सातारा जिल्हय़ात तळ ठोकून होते. तर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्या राजकारण्याने दबाव आणल्याचीही चर्चा सुरू आहे. ती व्यक्ती राजकारणातील  बडे प्रस्थ आहेच.पण एका राजकीय पक्षाचीही जबाबदार व्यक्ती असल्याचे समजते.  दरम्यान या प्रकरणी सांगलीच्या राजकीय वर्तूळात रविवारपासूनच जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी ती व्यक्ती सांगलीत आल्याचेही वृत्त आहे. पण याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. पोलीसांनी तपासात अडथळा येऊ नये यासाठी पुर्णपणे दक्षता घेतली असून तपासाबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. चिठ्ठीतील कोणतीही नावे अथवा मजकूर सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

  दरम्यान पोलिसांचा पुजारींनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. पण, तपासात अडथळा येईल अशी कोणतीही माहिती आपण देणार नाही. तपासातील सर्व बाबी गोपनीय असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली. पोलिसांची गोपनीयता आणि राजकारणी व्यक्तीच्या समावेशाची चर्चा यामुळे पुजारींच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे.

 

Related posts: