|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेतीवरील संकट सहकारच दूर करु शकतो – अजितराव घोरपडे

शेतीवरील संकट सहकारच दूर करु शकतो – अजितराव घोरपडे 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

सहकारामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला असून सहकार वाढला पाहिजे, शेतीवरील संकट सहकारी संस्थांशिवाय दूर होऊ शकत नाही. शेतीमधील कर्जासह अन्य कुठल्याही माफीं पेक्षा शेतीमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी समृध्द होईल. कर्ज माफीच्या धोरणापासूनच पतसंस्थांना गालबोटं लावले गेले. इंद्रप्रस्थ पतसंस्थेने आदर्श कारभार केला असून भविष्यात युवक व महिलांना एकत्र करुन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी येथे केले.

येथील इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा 23 वा वर्धापन दिन, दिनदर्शिका प्रकाशन व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, पतसंस्थेचे संस्थापक दिलीपराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

घोरपडे पुढे म्हणाले, समाजातील गरजू लोकांना पतसंस्था मदत करतात. सध्या शेतीमालाच्या भाव घसरल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱयाला संकटातून बाहेर काढण्यासाठी माफीचे धोरण उपयुक्त नाही. तर त्याच्या मालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सहकाराला मर्यादा व पर्याय नाही. अनेक माणसांना सहकार उभारी देऊ शकतो.

यावेळी दिलीपराव पाटील म्हणाले, बँकांचे व पतसंस्थांचे आर्थिक नियम वेगवेगळे आहेत. पतसंस्थेच्या माध्यामातून सामान्य माणसाला तात्काळ दोन ते पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचे स्वप्न उराशी बाळगून इंद्रप्रस्थची स्थापना केली. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन असल्याने ते स्वप्न हजार कोटींपर्यत गेले आहे. वित्तीय संस्था चालवताना संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केल्यास यश मिळते. इंद्रप्रस्थ पतसंस्थेने आदर्श कारभार करीत रौप्य महोत्सवीच्या दिशेने वाटचाल ठेवली आहे.

यावेळी आष्टेकर म्हणाले, जिह्यातील अनेक पतसंस्था अडचणीत आल्या असताना इंद्रप्रस्थ पतसंस्थेने चांगला कारभार केला आहे. पतसंस्थांची चळवळ टिकली पाहिजे. नोटाबंदी झाल्याने बँकांकडे मोठया प्रमाणात ठेवी जमा झाल्या आहेत. त्यामुळे संस्थांचा नफा कमी होणार आहे. संस्थांनी ठेवी व नफ्याच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे.

या समारंभात घोरपडे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन व उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आष्टानगरपालिकेच्या नगरसेविका पुष्पलता सतिश माळी, मनिषा प्रभाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार हैबत पाटील, सुरेंद्र शिराळकर तसेच सतिश माळी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष युवराज सुर्यवंशी यांनी केले. आभार उपाध्यक्ष विश्वास धस यांनी मानले. यावेळी जयकर पाटील, संजय पाटील, रोझा किणीकर, सहाय्यक निबंधक अमोल डफळे, भिमराव पाटील, सुहास पाटील, विजय पाटील, संग्रामसिंह पाटील, मोहनराव शिंदे, चंद्रकांत पाटील, राम दुर्वे, बबनराव थोटे, हेमंत पांडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

राजारामबापूंचा जिव्हाळा…

भाषणात घोरपडे म्हणाले, दिलीपतात्या व आम्ही राजारामबापूंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. बापूंचा जिव्हाळा जितका आम्हांला मिळाला, तितका जयंत पाटील यांना ही मिळाला नसेल. ते अनेक सभांना घेऊन जात असत. राजारामबापूंनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला, ती मंडळी आमदार झाले. तोच संदर्भ जोडून दिलीप पाटील म्हणाले, जयंतरावांनी राजकारणात येऊ नये म्हणून प्रस्थापितांनी खळखळ केली. त्याचे साक्षिदार घोरपडे आहेत. घोरपडे हे कुठेही असले तरी राजारामबापू म्हणून आम्ही एक आहोत. सहकारा विषयी आस्था असणारे घोरपडे हे आहेत.

 

 

Related posts: