|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अभियांत्रिकी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण बनावे – किर्लोस्कर

अभियांत्रिकी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण बनावे – किर्लोस्कर 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, असे कार्य करावे. विद्यार्थ्यांनी मुल्यांची जोपासना करुन ज्ञानाचा व कार्याचा दर्जा टिकवणे आवश्यक आहे. राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षणातील काम देशपातळीवर उच्च असून स्वायत्त म्हणून शिक्षण देताना अभियांत्रिकी शाखांचे ज्ञान देतानाच विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनवावे, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लि.पुणे चे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक संजय किर्लोस्कर यांनी केले.

येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बी.टेक, एम.टेक व एम.बी.ए शाखांच्या विद्यार्थ्यांच्या चौथ्या पदवीपूर्ती समारंभात किर्लोस्कर हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.डी.आर.मोरे, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, भगतसिंह पाटील, प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

किर्लोस्कर पुढे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नाव त्यांचे पुत्र जयंत पाटील व भगतसिंह पाटील यांनी उंचावले आहे. ग्रामीण भागात उद्योजकीय संधी कमी असतात. मात्र त्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. किर्लोस्कर कंपनीचे बहुतांशी युनिट ग्रामीण भागात आहेत. आज जगात कौशल्यपूर्ण तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे महाविद्यालयाने त्या प्रकारचे शिक्षण द्यावे.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, यश हे प्रचंड कष्ट व वैयक्तीक त्यागातून मिळते. पालक व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पदवीपूर्ती समारंभ हा आनंददायी असतो. राजारामबापू अभियांत्रीकी महाविद्यालयाने गुणवत्ता ठेवली आहे. अनेक प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रातील मिळवलेले यश हे महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. अभियांत्रीकी शिक्षण पद्धती मध्ये नविन तंत्रज्ञान आजच्या मानवी जीवनाच्या गरजा भागवण्यात सक्षम असले पाहिजे. किर्लोस्कर कुटुंब महाराष्ट्राच्या उद्योग जगतात महत्वाचे आहे. किर्लोस्कर कंपणीचे भारत व जगामध्ये अनेक उद्योग असून त्यांनी युके, साऊथ अफ्रिका, अमेरिका व नेदरलँड या देशात अनेक उद्योग खरेदी केले आहेत. आर.आय.टी महाविद्यालय अल्पावधितच अभिमत विद्यापीठ म्हणून दर्जा प्राप्त करेल.

प्रभारी कुलगुरु मोरे म्हणाले, आर.आय.टी हे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय आहे. ग्रामीण भागात अभियांत्रीकी शिक्षण देताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे. जगात अशक्य काहीच नाही. विद्यार्थ्यांनी भविष्यकाळात नावलौकिक मिळवावा.

डॉ.कुलकर्णी स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाल्या, आर.आय.टी जागतीक स्तरावरील अभियांत्रीकी शिक्षण देणाऱया संस्थांच्या संघटनेचा सभासद असून गुणवत्तापूर्ण व रोजगारक्षम शिक्षण पद्धतीचा अवलंब करणारे हे एक मेव महाविद्यालय आहे. अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला असून अनेक विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. महाविद्यालयाकडे 31 बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) रजिस्टर्ड असून चार व्यावसायीक उत्पादनांची निर्मिती केली आहे.

या समारंभात तीन्ही शाखातील सुवर्ण पदक विजेते, प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना किर्लोस्कर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच आर.आय.टी ने तयार केलेल्या व्यावसायीक उत्पादनांचे अनावरण करण्यात आले. संजय किर्लोस्कर यांनी आर.आय.टी च्या ग्रंथालयास भेट दिली. त्यांनी विविध उत्पादनांच्या व संशोधन प्रकल्पाच्या प्रदर्शनास भेट दिली.

या समारंभास कासेगांव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव आर.डी.सावंत, नियामक मंडळाचे सदस्य प्रा.शामराव पाटील, पी.आर.पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. पदवीपूर्ती समारंभाचे सूत्रसंचलन प्रा.सॅमसन चर्चिल, डॉ.एम.टी.तेलसंग, डॉ.हेमलता गायकवाड, डॉ.अनुराधा गायकवाड यांनी केले. आभार रजिस्ट्रार राजन पडवळ यांनी मानले.

Related posts: