|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रवादी काँगेसचा निवडणूक धंदा बालेकिल्ल्यात तेजीत

राष्ट्रवादी काँगेसचा निवडणूक धंदा बालेकिल्ल्यात तेजीत 

विशेष प्रतिनिधी/ सातारा

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, हे वाक्य जिल्हा गेल्या 18 वर्षांपासून घोकत आहे. देशातील मोदीपर्वानंतर या बालेकिल्ल्यातही राष्ट्रवादीला भुकंपाचे अनेक धक्के सोसावे लागले असले तरी बाज अजून कायम आहे. स्थापनेपासूनच पवारांच्या पक्षावर जिल्हय़ाने पुर्ण विश्वास दाखवला. पवारांच्या पुण्यापेक्षा साताऱयातच राष्ट्रवादीला जादा डिमांड असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. गंमत म्हणजे अनेक पातळय़ांवर राष्ट्रवादीला ओहोटी लागली असतानाही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ऐन निवडणूकीत राष्ट्रवादीला बालेकिल्ल्य़ात सर्वाधिक उठाव आहे. पुण्यात 1100, कोल्हापुरात 627, सांगलीत 681 तर बालेकिल्ल्यात 1502 अर्ज विकले गेले आहेत. दहा हजाराला एक फॉर्म या प्रमाणे साताऱयात अर्ज विक्रीचा रितसर ‘धंदा’ 1 कोटी, 50 लाख 20 हजार रूपये इतका झाला आहे.

दरम्यान, जिल्हय़ात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या काँग्रसमधे अजून हालचाली दिसेनात. त्यामानाने भाजपाने मंत्र्यांच्या सभा घेऊन किमान माहोल तरी तयार करायला सुरूवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करता, हा केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरताच पक्ष असल्याचा आरोप सुरूवातीपासून व्हायचा. सहाजिक पक्षाचे इथे गेली 15 वर्ष प्राबल्य होते. मात्र देशातील मोदीपर्वानंतर पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पक्षाच्या पडझडीला सुरूवात झाली. कोल्हापूर, सांगली व पुण्यात विरोधकांनी राष्ट्रवादीला सळो कि पळो करून सोडले असताना सातारा जिल्हा हा अजून शाबूत असल्याचे या निवडणूकांच्या तोंडावरही दिसत आहे.

मोठी ताकद असलेल्या पक्ष उमेदवारी देण्यासाठीचे पक्षाचे फॉर्म विकत देते व त्यातूनच आपला पाटी फंड उभारते. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणूकीत तोंड भाजलेल्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत उमेदवार फुंकून घ्यायला सुरूवात केली आहे.

सांगली, कोल्हापुरमधे धिम्या गतीने

आकाराने कोल्हापुर जिल्हा मोठा असला तरी कोल्हापुरात राष्ट्रवादी अजुन धिम्म्या गतीने चालत आहे. अद्याप कोल्हापुरात 627 अर्जांची विक्री झाली असून केवळ 438 अर्ज भरून पक्षाकडे जमा झाले आहेत. सांगली जिल्हय़ात 681 अर्ज विक्री झाली असून हे अर्ज प्रत्येक तालुक्याने आपापल्या तालुकाध्यक्षांकडे द्यायचे असल्याने किती अर्ज दाखल झाले याचा आकडा आलेला नाही. पवारांच्या जिल्हय़ात म्हणजेच पुण्यात केवळ 1100 अर्ज विक्री झाली असून मुलाखतींना सुरूवात झाली आहे.

साताऱयात गोळा झालाय सर्वाधिक पक्षनिधी

पवारांनी साताऱयातून घेताना भरभरून घेतले पण देताना हात सावरूनच दिले. सर्वाधिक आमदार-खासदार साताऱयाने द्यायचे पण मंत्रीपदे देताना कंजूसपणा करायचा. सगळे लाल दिवे साताऱयातून सांगली-कोल्हापूरकडे घोंगावत जायचे. गेल्या 18 वर्षांत पक्षाकडून कमी मिळाले असले तरी जिल्हावासीयांचे पक्षावरील प्रेम कमी झालेले नाही. नगरपालिका निवडणूकांमधे कराड व वाईत भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर पक्षाने या निवडणूकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. नुकताच शेंद्रय़ात जंगी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केल्यानंतर कार्यकर्त्यांमधे जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक अर्ज विक्री साताऱयात 1 हजार पाचशे दोन इतकी झाली आहे.

Related posts: