|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हॉटेल मालकास भरदिवसा लुटले

हॉटेल मालकास भरदिवसा लुटले 

प्रतिनिधी/ कराड

आगाशिवनगर येथील मोरया कॉम्पलेक्ससमोर सीआयडीचे अधिकारी असल्याची बतावणी करून मलकापूरच्या शिवदर्शन हॉटेल मालकास भरदिवसा लुबाडल्याची घटना रविवारी घडली. तोतया अधिकाऱयाने हॉटेलमालक रवींद्र नारायण शेट्टी (वय 69 रा. आर्यभुषण अपार्टमेंट, आगाशिवनगर-मलकापूर) यांच्याकडील सोन्याच्या साखळीसह दहा हजारांची रोकड घेऊन पलायन केले. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रवींद्र नारायण शेट्टी यांच्या मालकीचे शिवदर्शन हॉटेल कृष्णा रूग्णालयासमोरील डीएमएस कॉम्लेक्स येथे आहे. शेट्टी हे दररोज सकाळी हॉटेलमध्ये पायी चालत जातात. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ते जेवण करण्यासाठी चालत घरी निघाले होते. कराड-ढेबेवाडी रोडवर मोरया कॉम्पलेक्ससमोर आल्यावर राखाडी रंगाचे जॅकेट घातलेला एक अनोळखी इसम उभा असलेला दिसला. त्या इसमाने शेट्टी यांना थांबवत खिशातून आयडेंटी कार्ड काढले. आयडेंटी कार्ड शेट्टी यांना दाखवत त्याने आपण सीआयडीचे अधिकारी असल्याचे सांगितले.

शेट्टी यांनी कार्डवर पाहिले असता ‘महाराष्ट्र पोलीस’ असे लिहलेले दिसले. शेट्टी थांबल्यावर तोतया सीआयडी अधिकाऱयाने तुम्ही भरदिवसा एवढे दागिने घालून कसे काय फिरता, अशी विचारणा करत दागिने काढण्यास सांगितले. त्याचवेळी आणखी एक इसम तिथून बॅग घेऊन निघालेला होता. त्यालाही तोतया अधिकाऱयाने अडवत त्याची बॅग तपासली. दुसऱया इसमाची बॅग तपासून झाल्यावर तोतया सीआयडी अधिकाऱयाने शेट्टी यांना गळय़ातील सोन्याची साखळी व खिशातील पैसे काढण्यास सांगितले.

शेट्टी यांनी गळय़ातील सोन्याची साखळी व खिशातील दहा हजारांची रोकड काढून हातात घेतली. त्या संशयिताने सोनसाखळी व रक्कम माझ्याकडे द्या. मी तुम्हाला पिशवीत घालून व्यवस्थित ठेवून देतो, असे सांगितले. शेट्टी यांच्यासमोरच त्याने सोन्याची साखळी व दहा हजारांची रोकड प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्याचा बहाणा करत हातचलाखीने मुद्देमाल गायब केला. प्लास्टिकची पिशवी शेट्टी यांच्या हातात दिल्यावर तोतया सीआयडी अधिकारी व ज्याची बॅग त्याने तपासली होती, ते दोघेही एकाच दुचाकीवर बसल्याचे शेट्टी यांना दिसले. संशय आल्याने त्यांनी पिशवीत पाहिले असता पिशवी मोकळी असल्याचे दिसले. आपणास गंडा घातला आहे हे  लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुचाकीवरून दोघे संशयित पसार झाले होते.

भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने आगाशिवनगर भागात खळबळ उडाली. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Related posts: