|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तपशीलाची लयलूट म्हणजे कवितेतील प्रयोगशीलता नाही!

तपशीलाची लयलूट म्हणजे कवितेतील प्रयोगशीलता नाही! 

सावंतवाडी : अर्थ हरवत जाऊन विषाद निर्माण करण्याच्या काळात आज कविता लिहिली जात आहे. पण तपशीलाची लयलूट म्हणजे कवितेची प्रयोगशीलता नव्हे. प्रयोगशीलता ही कालसंबद्ध संकल्पना आहे. तिचा विचार काळाला जोडूनच करावा लागतो. त्यामुळेच गेल्या पंचवीस वर्षांत लिहिल्या गेलेल्या दीर्घ आणि इतरही प्रयोगशील कविता जागतिकीकरणाच्या दाबातूनच लिहिल्या गेल्याचे मत नामवंत कवी आणि समीक्षक गणेश विसपुते यांनी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे साहित्य अकादमीतर्फे आयोजित ‘गेल्या 25 वर्षातील कवितेतील प्रयोगशीलतेचे मूल्यमापन’ या चर्चासत्रात केले.

येथील श्रीराम वाचन मंदिर, बांदा महाविद्यालय आणि सिंधुदुर्ग साहित्य संघ यांच्या सहकार्याने साहित्य अकादमीतर्फे आयोजित चर्चासत्रात ‘कवितेतील प्रयोगशीलतेचे मूल्यमापन’ विषयावरचे चर्चासत्र ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. अविनाश सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. विसपुते, कवी प्रा. डॉ. गोविंद काजरेकर यांनी निबंध वाचन केलेल्या या चर्चासत्राच्या मंचावर चर्चक म्हणून कवयित्री डॉ. शरयू आसोलकर आणि कवी अजय कांडर उपस्थित होते.

विसपुते म्हणाले, गेल्या 25 वर्षातील कवितेच्या प्रयोगशीलतेचा विचार करताना आपल्या या कालावधीतील दीर्घ कवितेचा प्राधान्याने विचार करावा लागतो. यात अरुण काळे, संतोष पद्माकर पवार, मंगेश नारायण काळे, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, कविता महाजन यांच्या कवितेचा अग्रक्रमाने विचार करावा लागेल. 25 वर्षांत बसलेला प्रत्येक झटका या कवितांमध्ये दिसतो. समकालीन बाजारी व्यवस्थेत संवेदनशील व्यक्तींची शोकात्मक घुसमट यातील काही कवितांमध्ये दिसते.

डॉ. काजरेकर म्हणाले, प्रयोगशीलता ही परंपरा विरोधी मूल्यमापक संज्ञा आहे. त्यामुळे कवींना परंपरेच्या अनिष्ठ प्रथेविरोधात जाऊन प्राधान्याने विचार करावा लागतो. तसा विचार मराठीतील 90 नंतरच्या काही कवींनी केलेला दिसतो. प्रयोगशीलतेसाठी कवीला स्वतःच्या स्वतंत्र काव्यभाषा शैलीचा विचार करावा लागतो. प्रयोगशीलतेसाठी लोकसंस्कृतीचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. तसा वापर कवी वीरधवल परब यांनी आपल्या कवितेत केलेला दिसतो.

डॉ. सर्पे म्हणाले, एका पिढीतील सगळे कवी वाचल्यानंतरच त्या पिढीतील कवितेचे प्रयोगशील मूल्य कळते. आजचे सगळेच समकलीन कवी एकमेकात गुंतून चालले असल्याचे जाणवते.

अजय कांडर म्हणाले, दोन्ही निबंधकांनी निबंधातून चांगली मांडणी केली. पण प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावा लागत असला, तरी प्रयोग करणेही तुमची गरज वाटत असेल, तरच चांगली प्रयोगशीलता निर्माण होऊ शकते. प्रयोगशील कवी म्हणवून घेण्यासाठी कविताच वाचकांना न कळणे म्हणजे प्रयोगशीलता नव्हे. भाषा कागदावर उतरल्यावर त्यातून अर्थच निघून जात असेल, तर कविता कशाला लिहायला हवी?

डॉ. आसोलकर म्हणाल्या, दोन्ही निबंध वाचकांनी गेल्या 25 वर्षातील कवितेतील प्रयोगशीलतेचा चांगला आढावा घेतला. कमी वेळात सगळय़ाच कवींच्या कवितांचा आढावा घेता येत नाही ही मर्यादा लक्षात घेऊनही निबंध वाचकांनी कवितेच्या प्रयोगशीलतेचे चांगले स्पष्टीकरण दिले. चर्चेदरम्यान वामन पंडित यांनी निबंध वाचकांनी उल्लेख केलेल्या कवींच्या कवितांची प्रयोगशीलतेबाबतची नेमकी वैशिष्ठय़े कोणती हे स्पष्ट करायला हवे होते, असे सांगितले. प्रा. अनिल फराकटे यांनी नवनवे शब्द वापरले म्हणजे ती कविता प्रयोगशील होऊ शकते का? असा सवाल केला.

सुत्रसंचालन सुमेधा नाईक यांनी केले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. वसंत पाटणकर, डॉ. अरुणा दुभाषी, साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुणे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. प्रवीण बांदेकर, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत, रमेश बेंद्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

Related posts: