|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाहतूक सप्ताहातही शहरातील वाहतुकीचा बोजवारा

वाहतूक सप्ताहातही शहरातील वाहतुकीचा बोजवारा 

रावसाहेब हजारे / सांगली

 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतुक पोलीसांच्या वतीने जिल्हाभर वाहतुक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमीत्त जागृती मेळावे आणि कार्यशाळा घेण्यात येत आहेत.पण एका बाजूला वाहतुक सुरक्षा सप्ताहाचे ढोल बडवले जात असतानाच शहरातील वाहतुकीचा पुर्णतःबोजवारा उडाला आहे. फुटपाथ अजूनही अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तर रस्ते आणि चौक अतिक्रमणामुळे गुदमरले आहेत. वाहतुक सुरक्षा सप्ताहाचा उपयोग केवळ पावत्या फाडून गल्ला भरण्यासाठीच सुरू असल्याचे चित्र आहे. या सप्ताहाच्या निमीत्ताने जनजागृती आणि वाहतुकीला शिस्त लावण्याकडे मात्र कानाडोळा सुरू आहे.

जिल्ह्यात रस्ते अपघातामुळे जिल्हय़ात दररोज एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. तर अपघात प्रवण क्षेत्रांची यादी मोठी आहे. रस्ते अपघाताच्या निमीत्ताने रस्ते अपघाताची कारणे आणि उपाय यावर बरेच मंथन घडले. आ.सुधीर गाडगीळ यांच्या साक्षीनेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख,आर.टी.ओ.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांनी आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.  विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमातील काही भाग काढून टाकून त्यांना सातबारा आणि ड्रायव्हिंग शिकवण्याची गरज आहे. सुजान नागरिक घडवण्याची कोणतीच तरतुद शालेय अभ्यासक्रमात नाही. विद्यार्थ्यांना वाहन चालवण्याचे शास्त्रीय शिक्षण देण्याची गरज आहे. आजही अपघातामधील मृत्यू झाल्यामुळे 28 टक्के कुटूंबे दारिद्रय़रेषेखाली आली आहेत. अपघाताची भिषणता विषद करताना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी  जागृत राहण्याचे आवाहन केले.रस्ते आणि चौक रूंदीकरण,अतिक्रमण मुक्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावर मनपा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी महापालिकेची आर्थिक अडचण सांगितली. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी आपली सुरक्षा कुटूंबाची रक्षा असल्याचे सांगत राज्यात रस्ते अपघातामध्ये होणाऱया मृत्यूंची संख्या ही आतंकवाद अथवा पुर्वीच्या काळी येणाऱया साथीच्या आजारापेक्षाही जास्त असल्याचे सांगितले. पण याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही.अपघातानंतर विश्लेषण केले जात नाही. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी कारवाईत चौपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट केले.पण या सर्व चर्चेमध्ये वाहतुक सुरक्षित करण्यासाठी ठोस कारवाई होताना दिसत नाही. चौकाचौकात वाहतुक पोलीस आजही केवळ पावत्या फाडण्याचेच काम करताना दिसत आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली केवळ तुंबडय़ा भरण्याचेच काम सुरू आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच चौकाचौकातील अतिक्रमण काढण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर काही दिवसांपुर्वी जिल्हाधिकाऱयांनी अतिक्रमण मुक्त केलेले रस्ते पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत.

आजही अनेक वाहतुक पोलीस मुख्य चौक सोडून आडबाजूला उभे असलेले दिसतात. शहराबाहेरच्या नाक्यावर सकाळी सहा वाजल्यापासूनच पोलीस हजर दिसतात. तासगाव फाटा,तानंग फाटा, कुपवाड शहरनजीकचा सावळी फाटा, आदी ठिकाणी वाहतुक पोलीस वाहने अडवून उभे असलेले दिसतात. याशिवाय सांगली शहरातील वाहतुकीची जबाबदारी महिला पोलीसांवर आहे. बहुतांशी चौकात महिला पोलीसच दिसतात. पण अनेक पोलीस बायपास रोड, कोल्हापूर रोड, शिंदे मळा,अहिल्यादेवी होळकर चौक, साखर कारखाना, गोकुळनगर आदी परिसरात आडबाजूला उभे असलेले दिसतात. वाहतुक पोलीसांची ही कारवाईची शैली संशयास्पद आहे. नागरिकांतून याबाबत तीव्र नाराजीचा सुर आहे. वाहतुक नियम मोडल्यामुळे पोलीसांनी केलेली कारवाई कोणालाही आवडत नाही,पण शिस्तीसाठी उगारलेला कारवाईचा बडगा कोणालाही अडचणीचा ठरण्याची आवश्यकता नाही. त्याची तमा न बाळगता रस्ता सुरक्षा सप्ताहात तरी पोलीसांनी किमान वाहतुक शिस्त आणि सुरक्षा याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शहरातील अनेक चौकात नेहमीच वाहतुक ठप्प झालेली असते. गर्दीच्या ठिकाणी असणाऱया शाळांच्या मार्गावर शाळेच्या वेळेत वाहतुक पोलीसांची गरज असते. पण हिराबाग रोडसारखे चौक शाळेच्या वेळेत नेहमीच एक तासभर ठप्प असतात. अतिक्रमणे,विद्यार्थ्याची गर्दी,आणि वाहनांची कोंडी यामुळे वाहतुक ठप्प होते.पण कित्येक दिवसांपासून वाहतुक पोलीसांना याकडे लक्ष देण्यास वेळच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी शहरात रस्त्यावरच उभा राहणाऱया ट्रव्हल्सचा प्रश्नही गंभीर आहे. चौकाबरोबरच मुख्य रस्त्यावरही वाहतुकीला अडथळा होईल अशा ट्रव्हल्स उभ्या असतात. पण त्याकडे फारसे कोणाचेही लक्ष नसते.वाहतुक सप्ताहाच्या निमीत्ताने तरी या बाबीकडे वाहतुक पोलीसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 

Related posts: