|Monday, February 17, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » खरे ‘सायकल’स्वार अखिलेशच

खरे ‘सायकल’स्वार अखिलेशच 

कृपादान आवळे / ऑनलाईन टीम :

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत कलह निर्माण झाला होता. या कलहाची ठिणगी इतकी भडकली, की या पिता-पुत्रांनी आपली वेगवेगळी राजकीय चूल मांडण्याचे ठरवले. आता चिन्हाची प्रारंभीची लढाई अखिलेश ग्नयांनी जिंकल्याने ते यूपीच्या राजकारणाचे खरे सायकलस्वार ठरण्याचे चिन्हे आहेत.

अखिलेश यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या समर्थक उमेदवारांची यादीच जाहीर केली आणि सपाचे राष्ट्रीय अधिवेशनही बोलावले तेही मुलायमसिंह यादव यांना कोणतीही कल्पना न देता. इतकेच नव्हे तर अखिलेश यांनी मुलायमसिंह यांचे धाकटे बंधू आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना तडकाफडकी मंत्रिमंडळातून काढून टाकले. यात त्यांच्यासोबत त्यांचे चुलते रामगोपाल यादव हे सोबत होते. हे सर्व करत असताना अखिलेश यांनी मुलायमसिंह यांना अंधारातच ठेवले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या नेताजींनी अखिलेश आणि बंधू रामगोपाल यादव यांना पक्षातूनच बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर खरी लढाई सुरु झाली ती अखिलेश यांच्या अस्तित्त्वाची.

अखिलेश आणि त्यांचे चुलते रामगोपाल यादव यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर अखिलेश यांनी स्वबळाचा नारा दिला. आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे त्यांनी ठरवले. त्यामुळेच त्यांनी लगेचच त्यांच्या निवासस्थानी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावली. यावेळी अनेक समर्थकांनी या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा नेताजींनाच आव्हान देण्याचे ठरले. त्यामुळे या बैठकीत अखिलेश यांना तब्बल 207 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध झाले. वास्तविक पाहता, उत्तरप्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी 202 आमदारांची गरज आहे. अखिलेश यांना 207 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्रच सादर केले. त्यामुळे घाबरलेल्या नेताजींनी या सर्व घडामोडीनंतर सपाची सत्ता जाऊ नये, यासाठी एक पाऊल मागे जात अखिलेश आणि रामगोपाल यांचे निलंबन मागे घेतले. त्यानंतर ही सर्व राजकीय परिस्थिती नियंत्रणात येईल, असे नेताजींना वाटत होते. मात्र, असे काही झालेच नाही. याउलट अखिलेश यांना आपली ताकद चांगलीच समजली. त्यामुळे त्यांनी आपणच हुकूमी एक्का असल्याचे दाखवायचे ठरवले.

अखिलेश यांना पक्षाचे नेत्तृत्त्व करायचे होते. त्यामुळे त्यांनी थेट नेताजींनाच आव्हान दिले. आपल्याकडे पक्षाचे नेत्तृत्त्व असायला हवे. यासाठी त्यांनी आपला पक्षांतर्गत वाद हा निवडणूक आयोगाकडे नेला. त्यानंतर सुरु झाले ते मानापमान नाटय़. हे प्रकरण इतके ताणले जाईल, याची पुसटशी कल्पनाही नेताजींना नव्हती. हे सर्व झाल्यानंतर नेताजींना कळून चुकले की आता अखिलेशचे पारडे चांगलेच जड झाले आहे. आपली सत्ता आणि पक्षातील वर्चस्व नेताजींना गमवायचे नव्हते. त्यामुळे अखेर नेताजींनी “अखिलेशला पक्षाची धुरा तू सांभाळ, पण अध्यक्षपद माझ्याकडे राहू दे’’, असे सांगितले. पण अखिलेश याविषयी मागे हटतच नसल्याचे दिसले.

अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी घेतले. यावेळी अखिलेश यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल आणि मुलायमसिंह यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील मोहन पराशरन यांनी काम पाहिले. या सर्व प्रकारानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत निर्णय हा अखिलेश यांच्या बाजूने दिला. समाजवादी पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘सायकल’ अखिलेश यांना मिळाले आहे. स्वाभाविकच पक्षाची धुरा त्यांच्या हाती आली आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष यूपीच्या मैदानात उतरत असून, त्यांना काँग्रेस व अन्य घटक पक्षांचीही साथ लाभेल. त्यामुळे भाजपा व बसपाचा कस लागेल. तर मुलायम यांनाही आपल्या पुत्राच्या आव्हानाशी मुकाबला करावा लागेल.

अर्थात सध्या तरी अखिलेश यांचे पारडे जड आहे. आश्वासक व तरुण चेहरा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे यूपीत सायकलचीच हवा दिसत आहे. प्रत्यक्षात कोण बाजी मारते, हे लवकर कळेलच.

Related posts: