|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रांगणागडावर जाताना कुडाळच्या तरुणाचा मृत्यू

रांगणागडावर जाताना कुडाळच्या तरुणाचा मृत्यू 

कुडाळ  : कुडाळ शहरातील बांधकाम व्यावसायिक, रोटरी क्लबचे खजिनदार व औदुंबरनगर येथील रहिवासी नितीन सीताराम कुडाळकर (44) यांचा शुक्रवारी सकाळी रांगणागड चढत असताना हृदयक्रिया बंद पडून आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेने शहर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा मृतदेह सायंकाळी साडेचार वाजता कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर येथील नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. शनिवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर कुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज सकाळी नितीन कुडाळकर त्यांच्या मित्रांबरोबर रांगणागडावर जात होते. नारुर गावातून डोंगर चढत असताना त्यांना धाप लागली. त्यामुळे ते तेथे बसले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने 108 क्रमांकाला रुग्णवाहिकेसाठी दूरध्वनी केला, तो गारगोटी येथे लागला. तेथून रुग्णवाहिका आली. त्यांच्या मित्रांनी त्यांना उचलून गडापर्यंत नेले. तेथून त्यांना गारगोटी येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ही घटना नारुर (ता. कुडाळ) हद्दीत घडल्याने पोलिसांनी मृतदेह कुडाळ येथे नेण्यास सांगितले. त्यानुसार सायंकाळी मृतदेह कुडाळ येथे आणण्यात आला. गजानन पांडुरंग कांदळगावकर यांनी कुडाळ पोलिसांत खबर दिली.

                     कुटुंबियांचा आक्रोश

कुडाळकर यांचा मृतदेह कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्यांची पत्नी, आई, मुलगा व अन्य कुटुंबियांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. नितीन आपल्यात नसल्याचे समजताच सर्वांनी आक्रोश केला. उपस्थितांनाही अश्रू आवरणे अवघड झाले.

                  हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू

शवविच्छेदन डॉ. वालावलकर यांनी केले. हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉ. वालावलकर यांनी व्यक्त केला.

                    आज अंत्यविधी

कुडाळकर यांचा मृतदेह ओरोस येथील शवागृहात ठेवण्यात आला आहे. त्यांचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत कुडाळमध्ये येणार आहेत. शनिवारी सकाळी नऊ वाजता कुडाळमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी व अन्य परिवार आहे.

Related posts: