|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » छाननीनंतर 272 उमेदवार शिल्लक

छाननीनंतर 272 उमेदवार शिल्लक 

उत्तर गोव्यातील 19 मतदारसंघांतून 127,

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून अनेक ‘डमी’ व इतर उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. छाननीनंतर 40 मतदारसंघात मिळून 405 पैकी 133 अर्ज बाद ठरले असून 272 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.  त्यात उत्तर गोव्यातील 19 मतदारसंघांमधून 127 तर दक्षिण गोव्यातील 21 मतदारसंघांमधून 145 उमेदवारांचा समावेश आहे. आज शनिवार दि. 21 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ती मुदत संपल्यानंतर सायंकाळी उशिरा प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. बहुतेक सर्व 40 मतदारसंघात बहुरंगी लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आज चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढील 15 दिवस सर्व पक्षांसाठी, उमेदवारांसाठी कसोटीचे असून त्यांना तेवढाच मर्यादित कालावधी प्रचाराकरीता मिळणार आहे. सध्या प्रत्येक पक्ष, त्यांचे उमेदवार प्रचारात मग्न असून आपला पक्ष, उमेदवार कितपत योग्य हे मतदारांना पटविण्यावर भर देत आहेत.

घरोघरी प्रचारावर अधिक भर

प्रत्येक मतदारसंघातील गावागावात पक्षाच्या उमेदवारांच्या लहान बैठका तसेच कोपरा सभा चालू असून पक्षाचे ज्येष्ठ नेते तेथे हजेरी लावून उमेदवारांसाठी मते मागत आहेत. दुसरे पक्ष तसेच त्यांचे उमेदवार यावरही टीका करण्यात येत असून सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 ते 11 पर्यंत प्रचाराचे काम चालू आहे. प्रत्यक्ष मतदारांना भेटण्यावरच उमेदवारांनी तसेच त्यांच्या नेत्यांनी भर दिला आहे.

निवडणूक आचारसंहितेचे पालन शिस्तीने होत असून अनेक तक्रारी मुख्य निवडणूक अधिकाऱयांच्या कार्यालयात येत आहेत. परंतु त्यांचे स्वरुप किरकोळ असून त्यात गंभीर अशा तक्रारी नसल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरचे नेते पुढील आठवडय़ापासून येणार असून त्यांच्या जाहीर सभांचा धुरळा गोव्यात सर्वत्र उडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे

अधिकारी गोव्यात दाखल

निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी काल शुक्रवारी गोव्यात दाखल झाले आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस निवडणुकीशी संबंधीत विविध अधिकाऱयांसोबत त्यांच्या बैठका होणार असून, त्याबाबतचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपआयुक्त उमेश सिन्हा, महासंचालक निखिल कुमार, सुमीत मुखर्जी, दिलीप शर्मा व इतर अधिकारी गोव्यात आले आहेत.

दुपारनंतर सलग चार बैठका

शनिवार 21 रोजी दुपारी 3.30 वा. हॉटेल मॅरियॉट येथे विविध राजकीय पक्षांसोबत बैठक होणार आहे. संध्याकाळी 5 वा. गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱयांसोबत सोबत बैठक होणार आहे. संध्याकाळी 5.45 वा. अबकारी खाते, अमलीपदार्थ विरोधी विभाग, कंद्रीय नारकोटीक विभाग यांच्या अधिकाऱयांसोबत बैठक होणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता जिल्हा न्यायदंडाधिकारी व निर्वाचन अधिकाऱयांसोबत बैठक होणार आहे. रविवार दि. 22 रोजी सकाळी 10 ते 11 दरम्यान मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांसोबत बैठक होणार असून नंतर ते दिल्लीला रवाना होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Related posts: