|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सेनेकडून स्वबळावर लढण्याचे संकेत

सेनेकडून स्वबळावर लढण्याचे संकेत 

वेळ कमी, आम्ही आमचा निर्णय घेऊ : उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

प्रतिनिधी / मुंबई

आता वेळ कमी राहिला असून आमचा निर्णय आम्ही घेऊ, असे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचे सूचक वक्तव्य रविवारी पत्रकार परिषदेत केले.

शिवसेना आणि भाजपात युती व्हावी यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. पहिल्या बैठकीत दोन्ही पक्षांकडून सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. समसमान जागा लढण्याचा निर्णय घेताना दुसऱया बैठकीत 114 जागांची यादीही एकमेकांना आदान प्रदान करण्याचे ठरले. मात्र, एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर आणि पालिकेच्या कारभारावर टिका केल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी चर्चा थांबल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्याशिवाय चर्चा करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुढे चर्चा होणार की नाही, याबाबत संभ्रम असतानाच पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. यावेळी सेनेने भाजपला केवळ 60 जागांची यादी दिल्याने भाजप चांगलीच नाराज झाली. सेनेने दिलेल्या 60 जागांच्या ऑफरबाबत रविवारी मुख्यमंत्र्यांबरोबर भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या आमदारांनी सेनेच्या 60 जागांबाबत नाराजी व्यक्त केली असून यापुढे भाजपकडून युतीबाबत पुढाकार घेणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

भाजपला शिवसेनेने 60 जागांची ऑफर देणे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपचा खालच्या भाषेत समाचार घेणे. यावरुन शिवसेनेने भाजपच्या विरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याने सेना-भाजपात युतीवरुन चांगलाच तणाव निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातच रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता वेळ कमी असून आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे सांगितल्याने युतीबाबतचे चर्चेला पुर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. जर भाजपने 60 जागांचा प्रस्ताव मान्य केला तरच पुढे चर्चा करणार असल्याचे सेनेच्या सुत्रांनी सांगितले. तसेच युतीबाबतची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हाती युतीचा निर्णय आहे.

सेनेकडून भाजपचा अपमान : आशिष शेलार

शिवसेनेने युतीत भाजपला केवळ साठ जागा सोडण्याचे औदार्य दाखविण्यात आले आहे. हा भाजपचा अपमान आहे. त्याबाबत भाजपच्या आमदारांनी रविवारी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत तीव्र भावना व्यक्त केल्या. शिवसेनेबरोबर युती करायची का नाही; याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी देताना या बैठकीमध्ये महापालिकेचा जाहीरनामा आणि पारदर्शकतेवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

 भाजपसाठी 60 जागाही जास्त : संजय राऊत

भाजपची ताकद पाहता त्यांना दिलेल्या 60 जागाही जास्त आहेत. उद्धव ठाकरे हे दानशूर असल्याने त्यांनी 60 जागा दिल्या. मात्र, पक्षात 60 पेक्षा जास्त जागा भाजपला द्यायच्या नाहीत, असा मतप्रवाह असून आम्ही मुख्यमंत्र्यांचा आदर करतो त्यामुळे हा सन्मानाचा प्रस्ताव ठेवला आहे. महापालिका निवडणूक असल्याने नगरसेवकांच्या संख्येवरच ताकद मोजली जाईल.

Related posts: