|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बहरली ‘मैफल रंगसुरांची’

बहरली ‘मैफल रंगसुरांची’ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

‘रंगात रंगूनी साऱया रंग माझा वेगळा’ या शब्दाची प्रचिती रविवारी सकाळी टाऊन हॉल बागेमध्ये आलेल्या रसिक श्रोत्यांनी घेतली. इथे सादर होणारी प्रत्येक कला वेगळी, त्यामागील विचार वेगळा. त्यामुळे केलेच्या विविध रंगात रंगूनसुद्धा टाऊन हॉलचा रंग मात्र काही वेगळाच भासत होता. रंगसुरांच्या या मैफलीने जिह्यातील कलासक्त मनांना एकत्र आणले. रंगबहार संस्थेच्या वतीने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यातून कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबुराव पेंटर आणि विश्वनाथ नागेशकर यांच्या स्मृतींना कलात्मक अभिवादन करण्यात आले.

    यावेळी हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना ‘रंगबहार जीवन गौरव पुरस्कार’ तर  चित्रकार-शिल्पकार संजीव संकपाळ यांना ‘चंद्राश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे अध्यक्षस्थानी होते. संभाजीराजे म्हणाले, संस्थान काळात राजर्षी शाहू महाराजांनी कलाकारांना राजश्रय दिला. त्यामुळे कोल्हापूर संस्थानात सर्व कलांचा विकास झाला. चित्रकलेमध्ये तर कोल्हापूर स्कूल ही वेगळी ओळख निर्माण झाली. स्वातंत्र्यानंतर कलाकारांना राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे कलाकारांना कलेच्या संवर्धनासाठी बराच संघर्ष करावा लागतो. कलाकारांना मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रभागी आहोत. भविष्यात कलाकारांना शासनाकडून भरीव मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

  या रंगमैफलीला शर्वरी डिग्रजकर यांनी आपल्या गाण्याने स्वरसाज चढवला. हार्मोनियम हरिप्रिया पाटील यांनी तर प्रशांत देसाई यांनी तबला वादन करून साथ दिली. डिग्रजकर यांनी गुजरी तोडी रागाने त्यांनी गायनाची सुरूवात केली. यावेळी त्यांनी राग माला हा शास्त्रीय संगीतातील अभिनव प्रकार सादर केला. यामध्ये एकच बंदीश वेगवेगळ्य़ा रागातून गायली जाते. विख्यात गायक पं.अभिषेरीबुवांची रचना असलेली रागमाला शर्वरी यांनी सादर केली. या रागमालेतून त्यांनी शास्त्रीय गायनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवले. अवघे गरजे पंढरपूर या भक्ती गीतासह त्यांनी ‘उघडय़ा पुन्हा जहाल्या’ आणि ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ ही नाटय़पदेही सादर केली.

 संदीप घुले, विशाल भालकर, पुरूषोत्तम सरनाईक, प्रियांका चिवटे, फिरोज शेख, ऋषिकेश मोरे, महेश बाणदार, डॉ. सायली घाटगे, सिद्धार्थ गावडे, विपुल हळदणकर, गौरी शेळके यांनी निसर्गचित्रे, चित्रे, व्यक्तिचित्रे, कोलाज आदींची प्रात्यक्षिके कलाप्रेमींसमोर मांडली. तर जयदीप साळवी, घन:श्याम चावरे, पवन कुंभार, संजीव संकपाळ हे शिल्पकलेची प्रात्यक्षिके सादर केली.

  कलाकाराच्या विकसीत होण्याचा प्रवास सुमेध सावंत यांनी आपल्या रचनाचित्रातून मांडला. नोटाबंदीच्या निर्णयाचे तोटे अनुप संकपाळ याने आपल्या शिल्पातून मांडले. प्रशांत मोरे, संदीप कुंभार यांनी रांगोळीतून व्यक्तीचित्र सादर केले. गौरव काईंगडे याने मातीचे शिल्प सादर केले.

 ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, व्ही. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष अजेय दळवी, उपाध्यक्ष अमृत पाटील, सचिव धनंजय जाधव, सहसचिव अशोक पालकर, सदस्य विजय टिपुगडे, सागर बगाडे, संजीव संकपाळ, अतुल डाके, सर्जेराव निगवेकर, किशोर पुरेकर, राहुल रेपे, समन्वयक रियाज शेख, उज्ज्वल दिवाण उपस्थित होते.