|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिका, जि.प.साठी भाजपाची दे धक्का फिल्डींग

महापालिका, जि.प.साठी भाजपाची दे धक्का फिल्डींग 

श्रीकांत माळगे/ सोलापूर

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्यात गुंतली आहे. पण, भाजपाने मात्र या आघाडीची हवाच काढून घेण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली असून अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधीना पक्षात सामावून घेण्याबरोबरच काही ठिकाणी बरोबरीने काम करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली गतीमान केल्या आहेत. याचा निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती विश्वासनीय सुत्राकडून देण्यात आली.

महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असली तरी गेल्या काही वर्षात येथीलही राजकीय समिकरणे बदलली आहेत. सद्या शहरात भाजपाचाही ताकत वाढली आहे. त्यामुळे सत्ता आबाधित राखण्यासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीचा फॉर्म्युला अवलंबला असला तरी भाजपाने मात्र शिवसेनेला आत्तापर्यत तर युतीपासून चार हात दूरच ठेवत आहे. पण, शहर आणि ग्रामीण भागातील विरोधी पक्षाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना पक्षात सामील करून घेऊन विरोधकांना चांगलाच धक्का देण्याचे तंत्र आवलंबले आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि भाजपातील अंतर्गत संघर्षाला मुठमाती देण्यासाठी भाजपाचे काही नेते मंगळवारी सोलापूरात दाखल होत असल्याचेही सांगण्यात आले.

काँग्रेसमधून बाहेर पडून सेनेला जवळ केलेले महेश कोठे यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचेही खरे आहे. पण, सद्या त्यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे जाहीर केले असले तरी प्रवेशाचा त्यांचा विषय अद्याप संपलेला नाही. याशिवाय राजा राऊत, उत्तम जानकर, शहाजीबापू पाटील, संजयमामा शिंदे आदीसह अन्य प्रमुख मंडळी ही मंडळीही भाजपाच्या संपर्कात असून काहीजण थेट भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. तर काही जण निवडणूक काळात भाजपाबरोबर राहणार आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेचे काही आजी-माजी सदस्यही भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.

भाजपाशी संपर्कात असलेल्या या आजी माजी लोकप्रतिनिधीबाबत चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ मंगळवारी सोलापूरच्या जिल्हय़ावर येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत ज्यांच्यावर या जिल्हय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याच मंडळींना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संपर्कात असलेल्या नेत्यांशी चर्चा करून याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना देण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

जिल्हय़ाचे पालकमंत्री तथा आरोग्य आणि राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे राज्यमंत्री विजयकुमार देशमुख आणि सांगलीचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यातील अतंर्गत संघर्ष आहेच. निवडणूकाच्या काळात या दोघातील संघर्ष उदभवू नये याचीही दखल सोलापूर जिल्हय़ाच्या दौऱयावर येणारे भाजपाचे निरिक्षक दखल घेणार असल्याचेही सांगण्यात आले.