|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » घातक शस्त्रे बाळगणाऱयांना अटक

घातक शस्त्रे बाळगणाऱयांना अटक 

प्रतिनिधी/ कराड

येथील महाविद्यालयांच्या परिसरात सोमवारी सकाळी महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटात धुमश्चक्री उडाली. तलवार, चाकू, कोयत्यासह दांडक्यांचा वापर झाल्याने तणावपूर्ण वातावरण बनले होते. दरम्यान कराड शहरातही तीन ठिकाणी घातक शस्त्रे बाळगून फिरणाऱयांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रफुल्ल गाडे व हवालदार नितीन येळवे टाऊन हॉल परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी प्रद्युम्न दीपक सोळवंडे (वय-19 रा. शनिवारपेठ, कराड) हा संशयास्पदरित्या फिरत असताना दिसला. त्याला पोलिसांनी थांबण्यास सांगताच तो पळाला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून धारदार तलवार हस्तगत केली.

हवालदार भोसले हे मंडई परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मंडईत सनी नंदकुमार शिंदे (रा. समोश्वर मंदीरजवळ, गुरूवारपेठ कराड) हा चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. जाधव यांनी हवालदार भोसले यांना संशयिताचा शोध घेण्यास सांगितले. भोसले मंडईत शोध घेत असताना त्यांना सनी शिंदे चाकू घेऊन फिरत असताना आढळला.

दरम्यान  सैदापूर येथील काही युवक आणि कराड शहरातील युवकांच्यात एकमेकाला खुन्नस देण्यावरून वैमनस्य होते. यातूनच एकास मारहाणही झाली होती. त्याचा राग दोन्ही गटांतील युवकांच्या मनात होता.

 यातूनच सोमवारी सकाळी दोन गटातील महाविद्यालयीन युवक एकमेकांना भिडले. युवकांच्या हातात तलवारी, चाकू, कोयत्यासह दांडकी होती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे युवक-युवतींची चांगलीच धावपळ उडाली. दोन्ही गटातील युवक एकमेकांना मारहाण करत होते. हा प्रकार समजल्यावर विद्यानगर परिसरात गस्त घालणारे पोलीस घटनास्थळी धावले.