|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जांभेकरांनी दिलेला आदर्श जोपासावा!

जांभेकरांनी दिलेला आदर्श जोपासावा! 

देवगड : वृत्तपत्रांनी निर्भिड पत्रकारीता करीत असताना घटनेची माहिती समजून घेऊन त्यानुसारच बातमीदारी झाली पाहिजे. बातमीमधील सत्यता न पाहता एखाद्यावर अन्याय झाल्यास त्याचे परिणाम गंभीर स्वरुपाचे उमटतात. अन्यायकारक बातमीदारी होता कामा नये. यासाठी येथील पत्रकारांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. बातमीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अन्याय होत असेल तर भारतीय संविधानाने दिलेल्या हक्काप्रमाणे न्याय मागता येतो, याची माहिती सर्वसामान्यांना असावी. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांनी दिलेला आदर्श पत्रकरांनी जोपासावा, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.

देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने आदर्श दर्पण पत्रकारीता पुरस्कार वितरण कार्यक्रम मंगळवारी येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. राणे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक मधुसुदन नानिवडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर, उद्योजक विवेक नलावडे, उद्योजक प्रकाश गायकवाड, उद्योजक हनीफ मेमन, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद मुंबरकर आदी उपस्थित होते.

उद्योजक गायकवाड यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन होत असते. चांगल्या बातमीदारीमधून विकास होत असतो. विकास प्रक्रियेमध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची आहे, असे सांगितले. नगराध्यक्षा सौ. साळसकर यांनी वृत्तपत्र हा समाज मनाचा आरसा असून त्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटनांची माहितीही मिळत असते. विकासाबाबत केलेल्या लिखाणामधून दिशा देण्याचे काम होत असते, असे मत व्यक्त केले. जिल्हा पत्रकार संघाचे सचिव श्री. जेठे, प्रमुख मार्गदर्शक श्री. नानिवडेकर, तालुकाध्यक्ष श्री. मुंबरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मृतीप्रित्यर्थ आदर्श दर्पण ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार ‘तरुण भारत’चे प्रतिनिधी प्रशांत वाडेकर यांना शाल, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, भेटवस्तू देऊन आमदार राणेंच्या हस्ते देण्यात आला. तर शहरी विभागासाठी आदर्श दर्पण पत्रकारिता पुरस्कार शिरगावचे दिनेश साटम, ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार फणसगावचे अनिल राणे व उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार वैभव केळकर यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी सर्वश्री वाडेकर, साटम, राणे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी देवगड-जामसंडेचे सर्व नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी, देवगड शहर विकास मंडळाचे पदाधिकारी, व्यापारी पर्यटन मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक अयोध्याप्रसाद गावकर यांनी, तर स्वागत श्री. मुंबरकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण रानडे यांनी, तर आभार तालुका सचिव दयानंद मांगले यांनी मानले.