|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राजकीय पक्ष आणि तिकीट वाटप

राजकीय पक्ष आणि तिकीट वाटप 

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी परवापासून (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 3 फेब्रुवारी  आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात उत्सुकता असेल ती राजकीय पक्षांच्या उमेदवारी यादीची! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार हा सर्वात महत्त्वाचा घटक. त्यामुळे राजकीय पक्ष वेगवेगळे निकष लावून उमेदवाराची निवड करतात. अर्थात उमेदवार निवडीची प्रत्येक पक्षाची पद्धत वेगळी आहे. सर्वच पक्षांचा भर हा ‘इलेक्टीव मेरीट’वर असतो. निवडून येण्याची क्षमता या निकषावर राजकीय पक्ष नेत्यांच्या आपल्या नातेवाईकांना, जवळच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवून देतात. असे असले तरी प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवार निवडीची आपापली प्रक्रिया पार पडतो. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि त्यांच्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेचा घेतलेला हा वेध…

शिवसेना

इतर राजकीय पक्षांपेक्षा शिवसेनेची महापालिका उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगळी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2002 च्या महापालिका निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्याकडे ठेवली होती. त्यावेळी उमेदवार निवडताना उद्धव यांनी जे सूत्र वापरले तेच आजही वापरले जात आहेत. शिवसेना उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत विभागप्रमुखांचे महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी मुंबईत लोकसभा मतदारसंघनिहाय सहा विभागप्रमुख होते. आज विभागप्रमुखांची संख्या 11 इतकी आहे. प्रत्येक विभागप्रमुखाकडे विधानसभेच्या 3 ते 4 मतदारसंघाची जबाबदारी आहे. ‘मातोश्री’वरून आदेश आल्यानंतर विभागप्रमुख वॉर्डनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू करतात.

गटप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्याशी चर्चा करून विभागप्रमुख महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची वॉर्डनिहाय प्राथमिक यादी तयार करतात. ही यादी तयार करताना उमेदवाराचा वॉर्डातील जनसंपर्क, केलेली कामे, संघटनेतील योगदान आदींचा विचार होतो. गटप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि शाखाप्रमुख यांची मते जाणून घेऊन उमेदवारांना पसंतीक्रम दिला जातो. इच्छुक उमेदवारांच्या यादीला दोन ते तीन वेळा चाळणी लावून त्याची प्राथमिक यादी ‘मातोश्री’ला सादर केली जाते. या यादीवर उद्धव ठाकरे आणि विभागप्रमुख यांची चर्चा होते. विभागप्रमुखांनी सूचवलेल्या यादीतील जवळपास 50 ते 60 टक्के उमेदवार अंतिम केले जातात. ज्या वॉर्डात तिकीटासाठी तीव्र चुरस आहे अशा ठिकाणी खासदार, आमदारांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो.

पूर्वी शिवसेना उमेदवारांची यादी दैनिक ‘सामना’तून प्रकाशित केली जात होती. मात्र, अलिकडे उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जात नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या रात्री उमेदवारांना फोन करून उमेदवारी मिळाल्याची आणि एबी फॉर्मच्या संदर्भात माहिती दिली जाते. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार यादीविषयी जास्तीत जास्त गोपनीयता पाळण्याकडे शिवसेनेचा कटाक्ष असतो.

भारतीय जनता पक्ष

केंद्र आणि राज्यातील सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचा भर हा मतदार सर्वेक्षणावर असतो. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते आणि काही ख्यातनाम संस्था यांच्यामार्फत सर्वेक्षण केले जाते. साधारणत: दर तीन-सहा महिन्यांनी सर्वेक्षण होते. सर्वेक्षणात वॉर्डातील राजकीय स्थिती, भाजपच्या इच्छुक उमेदवारांविषयी मतदारांमध्ये असलेली भावना, उमेदवाराने केलेले काम आणि निवडून येण्याची क्षमता या बाबी विचारात घेतल्या जातात. या सर्वेक्षणाची इच्छुक उमेदवारांना फारशी कुणकुण लागत नाही.

उमेदवार निवडीची प्रक्रिया म्हणून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात.   त्यानंतर सर्वेक्षणातील माहिती आणि जिल्हाध्यक्षांची चर्चा करून उमेदवार अंतिम करण्यात येतात. गेल्या काही दिवसात भाजपमध्ये इतर पक्षातून मोठय़ा संख्येने नेते आणि कार्यकर्ते आले आहेत. बाहेरून आलेल्या या मंडळींना उमेदवारी जाहीर केली तर पक्षात अनेक वर्ष राबणाऱया कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक होईल याची  जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांपैकी काहींना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देऊन भाजपने अन्य नगरसेवक तसेच इच्छुकांना प्रतीक्षा करायला लावली आहे.

काँग्रेस

निवडणूक लोकसभेची असो की नगरपालिकेची काँग्रेसची उमेदवार निवडीची प्रक्रिया ठरलेली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात. अर्ज केलेल्या प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. उमेदवार मुलाखतीसाठी बायोडेटा घेऊन येतात. परंतु, इच्छुकांची संख्या आणि कमी वेळ यामुळे मुलाखत घेणारे नेते बऱयाचदा बायोडेटाला हात सुद्धा लावत नाहीत. मुलाखती संपल्या की पक्षाच्या संसदीय निवड मंडळाची बैठक होते. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा होते. चर्चेअंती निश्चित केलेली यादी ही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली जाते. काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया हा फार्स असतो. पक्षात गॉडफादर नसेल तर गुणवत्तेच्या जोरावर तिकीट मिळणे जवळपास दुरापास्त ठरते. त्यामुळे उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मोठा भडका उडतो.

मुंबई काँग्रेसमध्ये बरेच गट आहेत. मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्या गटानंतर आता मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम, कृपाशंकर सिंह, प्रिया दत्त असे गट तयार झाले आहेत. उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू झाल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी साठमारी सुरू झाली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवार निवडीसाठी प्रक्रिया निश्चित केली असली तरी तीच राबवली जाईल याची शाश्वती नाही. मुंबईतून उमेदवारांची जी यादी दिल्लीत जाईल ती अंतिम होईलच असे नाही. शेवटच्या क्षणापर्यंत घोळ घालण्याची काँग्रेसमध्ये परंपरा आहे. याशिवाय एबी फॉर्मचाही गोंधळ होतो.

राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही. त्यामुळे एखादा विभाग वगळता राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच नाही. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीतही इच्छुकांकडून अर्ज भरून घेऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. संसदीय मंडळाची बैठक होऊन उमेदवारांच्या नावावर चर्चा होते. मुंबईत विभागीय अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री जयंत पाटील आणि पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकत्र बसून पक्षाचे उमेदवार निश्चित केले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2012 च्या महापालिका निवडणुकीत तिकीट वाटप करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेतल्या होत्या. त्यावेळी लेखी परीक्षेत ज्यांना सर्वाधिक गुण मिळाले त्यांनाच उमेदवारी दिली की अन्य निकष लावण्यात आले याविषयी माहिती नाही. परंतु, आज पक्षाला मोठय़ा प्रमाणात गळती लागल्याने राज यांना उमेदवार निश्चितीसाठी लेखी परीक्षा गुंडाळून ठेवावी लागली. आता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून राज ठाकरे यांनी उमेदवार निश्चित केले आहेत.

Related posts: