|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जि.प.पं.स.च्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढवणार

जि.प.पं.स.च्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढवणार 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

कवठेमहांकाळ तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या मतदारसंघात शिवसेना स्वबळावर निवडणूका लढविणार असून तालुक्यामध्ये शिवसेनेला पोषक वातावरण आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये या निवडणूकीत शिवसेना खाते खोलणार अशी घोषणा कवठेमहांकाळ तालुका शिवसेना प्रमुख दिनकर पाटील यांनी केली.

जि.प.पं.समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कवठेमहांकाळ येथे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने तालुक्यात स्वतंत्रपणे निवडणूका लढवाव्यात असा सुर निघाला.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात आपण चाचपणी केली. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. चर्चा केली. या चर्चेमध्ये कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत उमेदवार उभे करण्याचे आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे. शिवाय तालुक्यामध्ये शिवसेनेला अत्यंत पोषक वातावरण आहे. त्यामुळेच या निवडणूकीत आपण ताकदीने उतरणार आहोत. कसल्याही परिस्थितीमध्ये यावेळी जि.प.पं.समितीच्या निवडणूकीत खाते खोलणारच असा ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कवठेमहांकाळ तालुक्याच्या दृष्टीने जीवनमरणाचा प्रश्न असणाऱया म्हैसाळ पाणी योजना, टेंभू पाणी योजना या दोन्हींसाठी शिवसेनेने राज्यात सत्ता असूनही शेतकऱयांच्या हितासाठी मोर्चे, आंदोलने केली. जलसंपदा राज्य मंत्री विजयबापू शिवतारे यांच्याशी अनेकवेळा शिवसेनेची शिष्टमंडळे भेटली. त्यामुळे या दोन्ही योजनांचे पाणी शेतकऱयांच्या बांधापर्यंत पोहोचले असा दावा दिनकर पाटील यांनी केला. ते म्हणाले, तालुक्यातील युवा शक्ती शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारसंघात तरुणांना संधी दिली जाईल.

कवठेमहांकाळ तालुक्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यात आपण आणि शिवसैनीक कुठेही कमी पडले नाहीत. अनेक विकासकामांवर मोर्चे आंदोलने केली. आंदोलने करताना सामान्य माणूस आणि शेतकऱयांचे हित डोळ्यांसमोर ठेवले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांसाठी लढा असा संदेश दिल्याने शेतकऱयांचे प्रश्नही सोडवण्यासाठी पुढे येत आहोत. असेही दिनकर पाटील म्हणाले.

जि.प.च्या चार मतदारसंघात उमेदवारी मागण्यासाठी उमेदवार मोठय़ा संख्येने पुढे येत आहेत. पं.स.साठीही निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार पुढे येत आहेत. त्यामुळे या इच्छुक उमेदवारांचे मत समजावून घेऊन धनुष्यबाण आम्ही चालवणार आहोत. सामान्य माणूस शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही देत पाटील यांनी या निवडणूकीत उतरणार असल्याचे स्पष्ट केले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील जि.प.पं.स.च्या निवडनुकीतील संभाव्य उमेदवारांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिल. जनतेची शक्ती आपल्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपणाला मिळाले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद, उद्धव ठाकरेंची साथ यामुळे आपण निवडणूकीत यशस्वी होऊ असा दावा अजिंक्य पाटील यांनी केला.

या बैठकीला बजरंग पाटील, जयसिंग शेंडगे, संजय चव्हाण, दिलीप गिड्डे, अनिल बाबर, धनंजय देसाई, संतोष भोसले, सिद्धेश्वर भोसले, अनिल पाटील, प्रकाश चव्हाण हे उपस्थित होते.

Related posts: