|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सडा तुरूंगात 49 कैद्यांचा पलायनासाठी उठाव

सडा तुरूंगात 49 कैद्यांचा पलायनासाठी उठाव 

जेलर, होमगार्डस्वर हल्ला. विजेचे दिवे, अन्य सामग्रीची तोडफोड उठावात 49 केद्यांचा समावेश

प्रतिनिधी / वास्को

सडा येथील उपतुरूंगातील कैद्यांनी हैदोस घालून जेलरसह दोघा होमगार्डवर हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हैदोस घालणाऱया कैद्यांना वठणीवर आणण्यासाठी रात्री दोन वाजेपर्यंत स्थानिक पोलीस व्यस्त होते. सुमारे तीनशे पोलिसांनी तुरूंगाभोवती कडे केले होते. जखमी जेलरला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. जेलच्या परिसरातील लोकांना काय प्रकार घडतोय ते कळण्यात मार्ग नव्हता. तुरुंगाभोवती पोलिसांनी मोठे कडे निर्माण करुन संरक्षण दिले होते. सुमारे तिनशे पोलीस तैनात होते.

 तरुंगातून पलायन करण्याचा प्रयत्न?

  सडय़ावरील उपतुरूंगात सध्या 49 कैदी असून या तुरूंगाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हल्लीच काही कैद्यांना कोलवाळ तुरूंगात हलवण्यात आलेले आहे. उर्वरीत कैद्यांनाही येत्या शुकवारी कोलवाळला हलवण्यात येणार होते. परंतु मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या कैदय़ांनी एकाच वेळी हैदोस घालायला सुरुवात केल्याने तुरूंगामध्ये एकच धावपळ सुरू झाली. कैद्यांनी आतील विजेचे दिवे तसेच अन्य सामग्री फोडून टाकली आहे. अंधार पसरल्याने त्यांना पडकण्यासाठी मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या तरीही 48 केद्यांना परत पकडण्यात यश आले होते. एका कैद्याचा शोध उशिरापर्यंत सुरु होता. तुरूंगातून बाहेर पडण्यासाठी कैद्यांनी हा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात आले. तरी निश्चित कारण उघड झालेले नाही.

 पोलिसांनी घातला तुरुंगाला गराडा

 काही कैद्यांनी तुरूंगातील एका जेलरवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. या तुरूंगातील दोघा होमगार्डनासुध्दा कैद्यांनी जखमी केले. या घटनेची माहिती मुरगाव पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे गांभिर्य ओळखून आणखी पोलीस कुमक घटनास्थळी बोलावण्यात आली. कैदी बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याच्या भितीने पोलिसांनी तुरूंगाला गराडा घातला.

 पहाटेपर्यंत तिनेश पोलिसांची तैनाती

 निवडणुकीच्या डय़ुटीनिमित्त गोव्यात दाखल झालेल्या केंद्रीय पोलिसांच्या तुकडय़ांचा तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांचाही या कामासाठी उपयोग करण्यात आला. सुमारे तिनशे पोलीस व सुरक्षा दलाचे जवान पहाटेपर्यंत या तुरूंगाभोवती तैनात करण्यात आले होते.

 रात्रभर सुरु होता कैद्यांचा गोंधळ

  पोलिसांनी तुरूंगात प्रवेश करून आतील कैद्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कैदी वठणीवर आले नव्हते. साडेबाराच्या सुमारास अधिक पोलिसांनी तुरूंगात प्रवेश केला व तुरूंगातील वातावरण नियंत्रणात ठेवले. तरीही रात्री दीड वाजेपर्यंत गोंधळ सुरूच होता.

 या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी, मुरगावचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, पोलीस उपअधीक्षक लॉरेन्स डिसोजा, पोलीस निरीक्षक निदाद देऊलकर, नॅलास्को रापोझ, उदय परब व इतर पोलीस अधिकारीही  घटनास्थळी उपस्थित होते.

कैद्यांच्या उठावामागे कारबोटकर?

 सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अश्पाक बेंग्रे खून प्रकरणातील संशयित आरोपी विनायक कारबोटकर याची कैद्यांनी केलेल्या या उठावाला फुस असल्याची माहिती उघड झालेली आहे. कारबोटकरला कोलवाळच्या तुरूंगात जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने सडय़ावरील तुरूंगातून पळ काढण्याचा बेत रचला होता. त्याच्या साथीने इतर कैद्यांनी तुरूंगात हा हैदोस घातला. परंतु पोलिसी बळापुढे त्यांचा बेत यशस्वी होऊ शकला नाही.

Related posts: