|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » आमच्याकडे पाहा कोण आलेय…

आमच्याकडे पाहा कोण आलेय… 

युतीच्या चर्चेत गेले दोन दिवस शिवसेनेचा आवाज वरचा लागला आहे. भाजपमध्ये एक किरीट सोमय्या सोडले तर बाकीच्या नेत्यांनी सेनेविषयी वाकडे बोलणे बंद केले आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आपली तलवार सध्या म्यान केली आहे.

रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युतीच्या चर्चेबाबत आशा उरलेली नाही असे सांगितले. सोमवारी दुपारी शिवसेनेचा वचननामा प्रकाशित करून टाकला. युतीचे संयुक्त घोषणापत्र होण्याची शक्यता दुरावलेली आहे असेच त्यांना जणू सुचवायचे होते.

पत्रकार परिषदेत उद्धव फुल फॉर्ममध्ये होते. भाजपवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. सेनेच्या वचननाम्यावर जो टीका करील तो देशद्रोही किंवा मुंबईद्रोही आहे असे मी म्हणेन, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मोदी सरकारच्या धोरणांना विरोध म्हणजे देशद्रोह असे सूत्र मध्यंतरी मोदी-भक्तांनी रुढ केले होते. त्याची ही खिल्ली होती.

एकूण सेनेचा आणि उद्धव यांचा नूर आक्रमक होता.

सध्याच्या राजकारणात बॉडी लँग्वेजला फार महत्त्व आहे. मराठीतला नूर म्हणजेच इंग्रजीतील ही बॉडी लँग्वेज.

आपले कार्यकर्ते आणि मतदार यांच्यासमोर आपला नूर कायम ठेवणे हे सर्व पक्षांसाठी आवश्यक ठरले आहे. भाजपसाठी तर ते फारच महत्त्वाचे.

त्यामुळेच एकीकडे युतीची चर्चा चालू ठेवतानाच भाजपकडे इतर पक्षातील नेते मोठय़ा प्रमाणात येत असल्याचे सांगत राहणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. सोमवारी दादर पूर्वेच्या वसंत स्मृती येथे मुद्दाम आयोजिलेला कार्यक्रम हा त्याचाच  एक भाग होता.

कृष्णा हेगडे आणि मंगेश सांगळे हे तसे फार मोठे नेते नव्हेत. पण त्यांच्या पक्षात येण्याचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. हेगडे यांची काल मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली गेली व आज मुद्दाम प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. कृष्णा हेगडे हे प्रिया दत्त यांचे स्वीय सहाय्यक होते. ते मूळचे कर्नाटकाचे. त्यांच्या वडिलांना सामाजिक सेवेबद्दलचा कर्नाटक सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. कृष्णा हेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून काँग्रेसमध्ये लुटूपुटू काम करीत होते. 45 वर्ष आपण काँग्रेसमध्ये होतो असे ते सांगतात. पण हौशी कार्यकर्ते असेच त्यांचे स्वरुप होते व आहे. त्यांच्यामागे समाजातील कोणताही मोठा वर्ग नाही. त्यांची सार्वजनिक जीवनातील कर्तबगारीही जेमतेम आहे.

विलेपार्ले या मध्यमवर्गीय मराठी, कन्नड व गुजरातीबहुल वस्तीत ते राहतात. नुकतेच दिवंगत झालेले माजी महापौर रमेश प्रभू यांचे जावई अशीही हेगडे यांची आणखी एक ओळख आहे. प्रभू हे पूर्वापार शिवसेनेचे. हिंदुत्वाच्या प्रचाराबाबतचा पहिला खटला डॉ. प्रभू यांच्याच बाबतीत झाला. पण गंमत अशी की प्रभू नंतर सेनेत बाजूला पडले. मग ते राष्ट्रवादी व मनसेत गेले.

हेगडेंचे एक कौतुक असे की सेना ऐन भरात असतानासुध्दा ते कधी त्या वाटेला गेले नाहीत.

सुनील दत्त यांच्यानंतर प्रिया दत्त खासदार झाल्या. प्रिया यांची राजकीय प्रतिमा घडवण्यात हेगडे यांचा मोठा वाटा होता. विशेषतः त्यांचे मीडिया रिलेशन त्यांनी फार उत्कृष्ट सांभाळले होते. याचाच फायदा त्यांना झाला व 2009 मध्ये पार्ले येथील विधानसभेचे तिकिट त्यांना मिळून गेले. त्यावेळी मनसेच्या शिरीष पारकरांनी शिवसेनेची वीसेक हजार मते खाल्ली. त्याचा फायदा मिळून निसटत्या बहुमताने हेगडे आमदार झाले.

विधानसभेत त्यांनी चांगली भाषणे केली. पण बाकी काम काही नव्हते. शिवाय काँग्रेसचे दिवसही फिरले होते. त्यामुळे 2014 मध्ये हेगडे अपेक्षेनुसार पराभूत झाले. भाजपचे पराग अळवणी तेथे विजयी झाले. खासदारकीला प्रिया दत्त या मध्य मुंबईच्या मतदारसंघातून हरल्या. तेथून भाजपच्या पूनम महाजन यांचा विजय काहीसा आश्चर्यकारक होता.

प्रिया दत्त यांचे नाव आता कोठेही येत नाही. गेल्या दोन वर्षात हेगडे हेही तसे  पिछाडीवरच होते. पण आज अचानक भाजपने त्यांना पुढे आणले. आशिष शेलार हे प्रिया दत्त यांच्या लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या वांद्रय़ातूनच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी या भागावर आता पकड बसवली आहे. ती मजबूत करायला कदाचित हेगडे यांचा उपयोग होईल कदाचित.

तो होतो की नाही हे नंतर ठरेल. पण हेगडेंमुळे भाजपचा आजचा दिवस चांगला गेला.

हेगडे यांच्यासोबत आलेले दुसरे नेते आहेत मंगेश सांगळे. हे एकेकाळचे मनसेचे अत्यंत आक्रमक व बोलायला चांगले असलेले नगरसेवक व आमदार. त्यांचा लोकसंपर्क व काम यामुळे प्रजा फाउंडेशननेसुध्दा उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड केली होती.

विक्रोळीमध्ये सांगळे यांची लढाई शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्याशी आहे. 2014 मध्ये राऊत विजयी झाले होते. भाजपवर सातत्याने जहरी टीका करणाऱया नेत्यांमध्ये सेनेचे संजय राऊत अग्रेसर आहेत. त्यांचे विरोधक म्हणून सांगळे यांचा उपयोग भाजपला होईल. शिवाय, विक्रोळी, भांडूप, मुलुंड इत्यादी भागात त्यांचे मराठी कार्डही भाजपच्या कामी येईल. मनसेच्या पहिल्या फळीतील आमदारांपैकी, प्रवीण दरेकर, राम कदम आणि मंगेश सांगळे हे आता भाजपवासी झाले आहेत. या आयातीचा भाजपला मराठी मतांसाठी कसा उपयोग होतो हेही पाहणे उद्बोधक असेल.

Related posts: