|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » आंबेडकरी भागांचा विकास करण्याची संधी

आंबेडकरी भागांचा विकास करण्याची संधी 

मुंबई शहरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ामधून 50 वर्ष जुनी असलेली बुद्ध विहार, आंबेडकरी जनतेच्या झोपडपट्टय़ा, विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह, मागासवर्गीय भागांमधील शाळा यासारख्या इतर विविध महत्त्वाच्या गोष्टी मुंबईच्या विकास आराखडय़ामधून वगळण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विकास करण्याची आम्हाला संधी मिळाली असून या संधीचे आम्ही आता सोने करून दाखविणार असल्याची मोलाची कामगिरी यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गौतम सोनावणे यांनी जाहीर केले.

मुंबई महापालिका निवडणुकीत रिपाइं कोणते विषय हाताळणार?

इंदु मिलच्या साडेचार एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे. कारण यामध्ये मुंबई महापालिकेचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेबांचे स्मारक व्हावे हा आमचा मुख्य मुद्दा असणार आहे. पालिका निवडणुकीत आंबेडकरी जनतेसोबत इतर विविध मागासवर्गीय समाजाच्या भागांचा कसा विकास होईल याबाबत आम्ही एक आराखडा तयार केला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची आम्ही एक यादी तयार केली आहे. मुंबईत रिपाइंची ताकद किती ते आम्ही या पालिका निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे. त्याचप्रमाणे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युतीबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर आमच्या पक्षाची भूमिका जाहीर करू. आमचा पक्ष सत्तेत आल्यानंतर कार्यकर्त्यांद्वारे किती कामे झाली ते देखील आम्ही यावेळी मांडणार आहोत.

पालिका निवडणुकीत रिपाइंची प्रचार मोहीम कशी असणार?

भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होणार की नाही याची आम्ही वाट पाहत आहोत. युती झाली की नाही यासाठी आम्ही थांबलो आहे. भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आमची भूमिका जाहीर करू. रिपाइंला केंद्रात मंत्रिपद असल्यामुळे आम्ही भाजपसोबतच राहणार आहे. युतीचा तिढा सुटल्यानंतर आम्ही प्रचार सभा, मतदारांची प्रत्यक्ष भेट, वॉर्ड निहाय सभा, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून प्रचार मोहीम राबविणार.

इतर बहुजन पक्षांविषयी तुमचे मत काय?

मुंबईसह राज्यातील 10 भागांमध्ये आठवले गट हा सर्वात मोठा आहे. मुंबईमध्ये आठवले गटाची सर्वात मोठी ताकद आहे. मुंबईमध्ये इतर दलित आणि बहुजन पक्ष केवळ कागदावर आहे. प्रत्यक्ष पाहायला गेले तर आठवले गटाचे वर्चस्व याठिकाणी आहे. रिपाइं (ए) या पक्षाची जेवढी मुंबईत कार्यालये आहेत तेवढी इतर दलित पक्षांची नाहीत.

भाजपचे नेते तुमच्या वॉर्डमध्ये प्रचार करणार का?

भाजप हा आमचा मित्र पक्ष असून त्यांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे असे सरळ गणित आहे. मात्र, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तसे झाले नाही. दलित मते भाजपला भेटल्यामुळे भाजपला यश मिळविता आले. मात्र, भाजपच्या नेत्यांनी आम्हाला मिळालेल्या जागांमध्ये प्रचार न केल्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. आम्ही प्रामाणिकपणे भाजप आणि शिवसेनेच्या वॉर्डमध्ये जाऊन प्रचार केला. मात्र, भाजप आणि शिवसेनेने तोच प्रामाणिकपणा आमच्या उमेदवारांसाठी न दाखवल्यामुळे आमचे उमेदवारांना हार पत्करावी लागली.

भाजपच्या की स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढविणार?

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. मान्यता प्राप्त पक्ष असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या निवडणूक चिन्हावर आम्ही पालिका निवडणूक लढविणार आहोत.

Related posts: