|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भाजपचा मराठी टक्का.. देणार सेनेला धक्का?

भाजपचा मराठी टक्का.. देणार सेनेला धक्का? 

मराठी माणसांचा टक्का मुंबईत नेमका किती आहे हे कोणालाही ठाऊक नाही. एकेकाळी तो पन्नास टक्क्यांवर असेल. नंतर तो 35, 27 असं करत करत आता 22 टक्क्यांवर आलाय असे म्हणतात. अर्थात यालाही आधार काही नाही. कदाचित तो जास्तही असेल.

एक नक्की. मराठी हा मुंबईतला सर्वात मोठा संघटित समाज आहे. राजकारणातला तो सर्वात सक्रिय घटक आहे. मंत्रालय, पालिका, पोलीस या यंत्रणांमध्ये अजून तरी त्याचा वरचष्मा आहे.

पण एकगठ्ठा असला तरी या मराठी समाजाला पूर्वापार सतत धास्ती वाटते.  धास्ती वाटायला लावणारे समाज बदलतात. खूप पूर्वी ही धास्ती दाक्षिणात्यांची होती. नंतर गुजरात्यांची वाटू लागली. अगदी अलिकडे उत्तर भारतीय किंवा भैय्यांची वाटत असे. सध्या कोणाची वाटते की नाही हे ठाऊक नाही. कारण शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलिकडे तसे काही म्हटलेले नाही. गेल्या कित्येक महिन्यांमध्ये वा वर्षांमध्ये त्यांनी याबाबत कुठले आंदोलन केलेलेही दिसत नाही. असो.

एरवी असली-नसली तरी निवडणुकांच्या काळात या मराठी टक्क्याला फार महत्त्व येते. मुंबईतला मराठी टक्का उर्फ मराठी माणूस एकसारखा विचार करतो असा समज त्याला कारणीभूत आहे. हा समज पक्का झाला शिवसेनेला मिळालेल्या यशामुळे. कारण मुंबईतील मराठी माणसांचा कैवार घेणारी संघटना म्हणजे शिवसेना  हे समीकरण ठोकून ठोकून रुजलेले आहे.

प्रत्यक्षातले चित्र थोडे वेगळे आहे. मुंबईतला सेनेचा मुख्य विरोधक कायमच होता तो काँग्रेस. पण मराठी ते सर्व सेनेकडे आणि बिगरमराठी काँग्रेसकडे असे काही नव्हते. काँग्रेसचे अनेक आमदार-खासदार वा नगरसेवक हे मराठी असत. त्यापूर्वी मृणाल गोरे वगैरेंचा समाजवादी वा जनता पक्ष होता. त्यांचेही बहुसंख्य नेते व कार्यकर्ते मराठीच असत. त्यांच्या सभा-मेळाव्यांमधील वा पक्षामधील मुख्य भाषाही मराठीच असे.

2012 च्या पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे 52 नगरसेवक निवडून आले होते. त्यातले तब्बल 19 जण मराठी होते. एम वेस्ट म्हणजे चेंबूर परिसरातला वॉर्ड होय. या वॉर्डातील एकूण आठ जागांपैकी चार जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे ते सर्व जण मराठी होते. (सीमा माहुलकर, वंदना साबळे, अनिल पाटणकर, संगीता हंडोरे). किंवा अगदी दक्षिण मुंबईतल्या मोक्याच्या मतदारसंघामधूनही काँग्रेसचे सुषमा साळुंके, ज्ञानराज निकम असे मराठी उमेदवार विजयी झाले होते. शिवडी, परळ, करीरोड, चिंचपोकळी यांचा समावेश असलेला एफ साऊथ वॉर्ड म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. पण तिथूनही सुनील मोरे व पल्लवी मुणगेकर हे दोन मराठी नगरसेवक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकले होते.

मुद्दा असा की, मराठी मते, मतदार, कार्यकर्ते, नेते, नगरसेवक वा आमदार ही केवळ शिवसेनेची मिरास नाही. सर्व पक्षांमध्ये कमीअधिक प्रमाणात हा मराठी टक्का होता व असतोच.

यंदा चित्र थोडे वेगळे आहे. युती होवो न होवो, शिवसेनेचा या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आहे भारतीय जनता पक्ष. इतके वर्षे भाजप हा सेनेचा दुय्यम भागीदार होता. मुंबईतील मराठी माणसांचा कैवार सेनेकडे असल्याने भाजपकडे आपोआप उरलेल्यांचा कैवार गेला होता. हे उरलेले समाज होते मुख्यतः गुजराती व हिंदी भाषिक. मुस्लिम व दलित हे भाजपकडे जाण्याचा प्रश्न नव्हता. दक्षिण भारतीयही त्यांच्यापासून तसे लांबच होते.

2014 मध्ये सत्तेची समीकरणे बदलली. नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे भाजपचे मुंबईत 15 तर शिवसेनेचे 14 आमदार निवडून आले. भाजपचा वरचष्मा झाला. सर्व समाजांमध्ये तो सर्वदूर पोचला असे चित्र उभे राहिले. विशेष म्हणजे, या वरचष्म्यातही मराठी टक्क्याचा वाटा लक्षणीय होता. सध्या भाजपचे शहरातले पंधरापैकी आठ आमदार मराठी आहेत.

आणि हा टक्काही त्यांना अचानक लाभला नव्हता. 2012 च्या पालिका निवडणुकीत भाजपचे 31 नगरसेवक निवडून आले. त्यातले सतरा मराठी होते.

मराठी या सर्वात चळवळय़ा राजकीय गटामध्ये किंवा टक्क्यांमध्ये भाजपनेही आपला जम बसवला असल्याचे हे चिन्ह आहे. मधल्या काळात त्या पक्षाने त्यासाठी काही पद्धतशीर पावलेही टाकली. उदाहरणार्थ आज या पक्षाचे मुंबईचा अध्यक्ष आशिष शेलार म्हणजे मराठी आहेत.

पण सेनेशी टक्कर द्यायची तर आणखी जोरदार प्रयत्न करावे लागतील. 2012 पालिका निवडणुकीत इ, एफ, जी दक्षिण व जी उत्तर- म्हणजेच परळ, वरळी, दादर या मराठीबहुल भागामध्ये भाजपचा एकही नगरसेवक नाही. भाजपचा जोर आहे तो आर सेंट्रल, आर साऊथ आणि टी- म्हणजेच मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या भागांमध्ये. बाकी, माटुंगा, घाटकोपर, मुलुंड, पार्ले इत्यादींच्या काही भागात त्यांचा कमीअधिक प्रभाव आहे.

ढोबळ मानाने, मूळ मुंबईत किंवा मुख्य शहरात सेना वरचढ आहे. पण, उपनगरांमध्ये स्थलांतरीत झालेल्यांमध्ये भाजपची ताकद दिसते. गेल्या दोन-तीन वर्षात प्रवीण दरेकर, राम कदम इत्यादींना आपल्याकडे वळवून भाजपने उपनगरांमध्ये बांधबंदिस्ती केली आहे. शिवाय निवडणुकीपर्यंत त्यांचे आणखी इनकमिंग चालूच राहील. आजच दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

मराठी टक्का विस्कळीत झाला आहे. आता तर खूपच विखुरलाही आहे. मुंबई जिंकायची असेल तर भाजपला त्यातला एका मोठा भाग कब्जात घ्यावा लागणार आहे. त्यांनी तशी तयारीही केली आहे. दुसरीकडे सेनाही गाफील आहे असे नव्हे. एकूण टक्कर घासून होणार आहे.

Related posts: