|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » तरुणांना संधी दिल्यास इतिहास घडेल : सुधाकर सुराडकर

तरुणांना संधी दिल्यास इतिहास घडेल : सुधाकर सुराडकर 

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई महापालिका निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद आजमावून आपल्याच मित्र पक्षांवर जागावाटपासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे काँग्रेस आघाडीचा तट्टू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी घोषित केली. दुसरीकडे गेली 25 ते 30 वर्षे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणाऱया शिवसेनेने युतीची वाट न पाहताच स्वत:चा वचननामा घोषित केला आहे. याचा अर्थ स्वत:च्या स्वार्थासाठी राजकीय पक्षांनी अशाप्रकारे राजकारण सुरू केले आहे. हेच राजकारणी पुन्हा एकदा सत्तापटलावर आले तर मुंबईचा सर्वांगीण विकास तसेच नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटंबदीचा परिणाम मुंबई महानगरपालिकेवर होणार नसल्याचे मत माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे जातीवाद, प्रांतवाद आणि भाषावादाचा संगम असल्याचा आरोप त्यांनी प्रत्येक पक्षावर केला आहे.

आताच्या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?

जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद आणि खालच्या थराला होणारी चिखलफेक यादृष्टेने मी या निवडणुकीकडे पाहतो. आज गेली 30 वर्षे झाली. मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची आहे? यापूर्वी कोणाची होती? मुंबई आणि मुंबईकरांचे काय झाले याबाबत माझा कोणत्याही पक्षावर राग नाही. निवडणुका जवळ आल्यानंतर तुम्ही एक अजेंडा घेऊन फिरता. त्याच अजेंडय़ावर तुम्ही सत्तेत आल्यानंतर काम करत नाही. सामान्य नागरिकाला रेशनकार्ड किंवा गुमास्ता परवाना काढायचा असल्यास पालिकेत किती खेटे घालावे लागतात हे सत्ताधाऱयांना माहीत असते. तसेच डोळय़ावर पट्टी बांधून कोणते कंत्राट कोणाला द्यायचे? कोठून खिसे गरम होतील हे पाहिले जाते. तर मतदार हा भावुक असल्याने त्याच्या भावनांना तुम्ही हात घातला की, तो सर्व काही विसरतो आणि खांद्यावर पुन्हा एकदा झेंडा उचलण्यासाठी तो सज्ज होतो. कारण भाषावाद, प्रांतवाद आणि जातीवादावर या सत्ताधाऱयांनी नस पकडलेली असते.

आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱयांचे काम कसे आहे?

मुंबईचे शांघाय करणार, न्यूयॉर्क करणार, सिंगापूर करणार अशा कितीतरी वल्गना या सत्ताधाऱयांनी केल्या. मात्र, एकही पूर्ण केली नाही. परदेशातील शहरांचे नाव घेऊन तुम्ही आपले मुंबई शहर त्याप्रकारे बनविण्याची वल्गना करता हे योग्य नाही. त्यापेक्षा तुम्ही मुंबई शहर असे बनवून दाखवा की इतर देश आणि राज्यांनी आपला आदर्श घेतला पाहिजे. परंतु, आपल्याकडे केवळ हात धुवून साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकही पक्ष अथवा सत्ताधारी असा नाही की, जो सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल.

यावर उपाय म्हणून काय सांगाल?

विविध पक्षातील जी सर्व जुनी खोडे आहेत त्यांना निवृत्ती द्या. त्यांना मार्गदर्शक बनवा आणि तरुणांना संधी द्या. कारण तरुण पिढीत काही तरी वेगळे करून दाखविण्याची उर्मी असते. ती उर्मी आणि उर्जाच एक नवीन इतिहास बनवू शकेल. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात सक्रीय होऊन विकासाची कामे हाती घ्यावीत.

विविध पक्षांचा अजेंडा कसा असावा?

प्रत्येक पक्षाचा अजेंडा किंवा कार्यप्रणाली पाहिली तर जातीवाद, प्रांतवाद आणि भाषावादावर अवलंबून आहे. देशात याला खतपाणी घालण्याचे काम हे सत्ताधारीच करत असतात. त्यामुळे हे सर्व मोडीत काढा आणि नवीन तरुणांना संधी द्या. कारण आजचा तरुण हा जातपात, भाषावाद, प्रांतवाद यांच्यापासून कोसो दूर आहे. परंतु, त्यांच्या मनात विष कालवण्याचे प्रयत्न हे मुरलेले सत्ताधारी करीत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तरुणांना प्राधान्य दिल्यास मुंबईचे नाव इतिहासात अजरामर होईल.

Related posts: