|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुचाक्या, मोबाईल, टीव्हींसह तीन कोटींचे घबाड जप्त

दुचाक्या, मोबाईल, टीव्हींसह तीन कोटींचे घबाड जप्त 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील व्यवसायिक कर खात्याने केलेल्या कारवाईत सुमारे तीन कोटी रुपयांचा बेकायदेशीर माल जप्त करण्यात आला आहे. त्यात दुचाकी, मोबाईल, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांच्या पुडय़ांचा समावेश आहे. व्यवसायिक कर चुकवून तसेच आवश्यक सोपस्कर पूर्ण न करता गोव्यात आणलेल्या या विविध वस्तू सध्याच्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांना प्रलोभन म्हणून वाटण्यासाठी आणण्यात येत होत्या, असा संशय आहे.

अशा प्रकारच्या वस्तूंची प्रलोभने दाखवून किंवा मद्याचा वापर करून मते मिळवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्यवसायिक कर खाते तसेच अबकारी कर खात्याने सध्या कंबर कसली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून दोन्ही खात्यांच्या भरारी पथकांनी राज्यात धाडींचे सत्र सुरु ठेवले आहे.

दरदिवशी शेकडो वाहनांची तपासणी

राज्याच्या सिमांवर कडक तपासणी होत आहे. 24 जानेवारी रोजी 217 मालवाहू वाहनांची संशयावरून तपासणी करण्यात आली होती. त्यातील 51 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. दुचाकी तसेच इतर वस्तू मिळून 88 लाख 21 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. नंतर 25 रोजी 340 मालवाहू वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील 34 वाहने ताब्यात घेण्यात आली असून सुमारे 1 कोटी 11 लाखांचा माल जप्त केला आहे.

पणजीत दहा लाखांचा माल जप्त

ज्या दुकानांतून वेळेवर कर भरला जात नाही, अशा दुकानांवर कारवाई करून बेकायदेशीरपणे साठवलेला माल जप्त करण्यात येत आहे. पणजीतील अशाच एका दुकानात 26 रोजी छापा मारण्यात आला. मोबाईल, टीव्ही व इतर वस्तू मिळून सुमारे 10 लाख 8 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

मोले चेकपोस्टवर वॉटर हिटर जप्त

शुक्रवार 27 रोजी मोले चेकपोस्ट येथे 55 मालवाहू गाडय़ा जप्त केल्या असून सुमारे 61 लाख 99 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच 2 लाख 6 हजार किंमतीचे 35 वॉटर हिटर जप्त केले आहेत.

 व्यवसायिक कर खात्याची दहा पथके    

व्यवसायिक कर खात्याने कडक धोरण अवलंबले असून 10 अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली दहा पथके नियुक्त केली आहेत. राज्यातील मुख्य शहरातून ही पथके कार्यरत आहेत. राज्यातील सगळय़ा सिमांवर कडक तपासणी केली जात असून गाडीत बेकायदेशीर माल असल्याचे आढळून आल्यास पुढील तपासणीसाठी गाडय़ा जप्त केल्या जात आहेत.

Related posts: