|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मद्य 43 लाखांचे तर, 32 लाखांचे ड्रग्ज जप्त

मद्य 43 लाखांचे तर, 32 लाखांचे ड्रग्ज जप्त 

मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

अमलपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) आतापर्यांत सुमारे 32 लाखाचे अमलीपदार्थ (ड्रग्ज) जप्त केले आहेत. अबकारी खात्यातर्फे आतापर्यंत सुमारे 33,543 लिटर म्हणजे 43 लाखाचे मद्य जप्त केले आहे. शिवाय मायणा-कुडतरी येथे नाकाबंदीत एका इसमाकडून 52 हजार रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.

 मद्य जप्त करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून काल अबकारी खात्याने एकूण 2652 लिटर मद्य ताब्यात घेतले. त्याची किंमत 1 लाख 53 हजार 173 रुपये एवढी आहे. काही मद्य वाहनातून तर काही खुल्या जागेतून जप्त करण्यात आले आहे. अबकारी खात्याची शोध मोहीम जोरात चालू आहे.

बत्तीस लाखांचे अंमलीपदार्थ जप्त

 अमलीपदार्थाचा सुळसुळाट मोठय़ा प्रमाणात वाढला असून गांजासह विविध अमलीपदार्थ अनेक ठिकाणी सापडले आहेत. त्यांची एकूण किंमत 32 लाखापर्यंत पोहोचली आहे. संबंधित खात्यामार्फत त्या प्रकरणाची पुढील चौकशी आणि तपासकाम चालू असल्याचे कुणाल यांनी सांगितले.

 प्रियोळातील अपक्ष उमेदवाराला कारणे दाखवा नोटीस 

प्रियोळ मतदारसंघातून दोन प्रकरणांची नोंद झाली असून एका अपक्ष उमेदवाराने जाती-धर्माबाबत टीका टिपणी केल्याने तेथील निर्वाचन अधिकाऱयांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. त्याशिवाय त्याच मतदारसंघातून गोवा प्लस नावाचा फेसबुक गट कार्यरत असून त्यावर आक्षेपार्ह चित्रे, मजकूर टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याची तक्रार पोलिसांकडे पुढील चौकशीसाठी देण्यात आली आहे. त्या गटाचे प्रोफाईल बोगस असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती कुणाल यांनी दिली.

काही तक्रारी खोटय़ा

सांतआंद्रे, वाळपई, साळगाव अशा काही मतदारसंघातून काही तक्रारी आल्या असून त्यांची तपासणी केल्यानंतर त्यात काही तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. थोडक्यात म्हणजे त्या तक्रारी खोटय़ा असल्याचे दिसून आले. थिवी-कोलवाळ येथे बॅनर्स तर म्हापसा येथे बसण्यासाठी बँचेस बांधण्याचे काम चालू होते. त्या ठिकाणी आणलेले साहित्य ताब्यात घेण्यात आले असून बेकायदा बांधकामे, मातीचे भराव टाकणे यांच्या तक्रारी नगर नियोजन खात्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचे कुणाल म्हणाले.

आप व भाजप पक्षांची वाहने जप्त

सांताक्रूझ मतदारसंघातून आप व भाजप या दोन पक्षांची वाहने जप्त करण्यात आली असून बॅनर्स लावल्यामुळे ती कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. पक्षाचा झेंडा वाहनावर लावला तर चालतो परंतु बॅनर्स लावायला नियमानुसार बंदी आहे. त्यामुळे निर्वाचन अधिकारी तसेच भरारी पथकाने ती वाहने ताब्यात घेतली असून पुढील कारवाई होणार असल्याचे कुणाल यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत 90 टक्के मतदान व्हावे यासाठी ध्येय ठेवण्यात आले असून त्यासाठी जागृती मोहीम चालू आहे. रविवार दि. 29 रोजी ‘वॉकथॉन’ हा उपक्रम सर्व मतदारसंघातून दाखवण्यात येणार असून त्यात मतदारांनी सामील व्हावे, असे ते म्हणाले.

Related posts: