|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » उल्हासनगरात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सेनेच्या गोटात

उल्हासनगरात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सेनेच्या गोटात 

उल्हासनगर / प्रतिनिधी

उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रिपाइं आठवले गट, साई पक्ष, काँग्रेस व अपक्ष अशा चार नगरसेवकांसह विविध पक्षांच्या दिग्गज नगरसेवकानी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

अनेक दिवसांपासून शांत बसलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी मराठा विभागातील मध्यवर्ती शिवसेना शाखेत सुरू झाल्या. या मुलाखतीना सद्याच्या 20 नगरसेवकांसह तब्बल 300 जणांनी उपस्थिती लावली. भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच उल्हासनगरात शिवसैनिक जमले होते. मुलाखती घेण्यासाठी शिवसेना मुख्यालयातून आमदार विनोद घोसाळकर, उपनेते रविंद्र नेर्लेकर हे आले होते.

सायंकाळच्या सुमारास पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी रिपाइं आठवले गटाच्या गटनेत्या पुष्पाताई बागुल, साई पक्षाचे नगरसेवक अंकुश म्हस्के, काँग्रेस नगरसेविका मीना सोंडे, अपक्ष नगरसेवक विजय पाटील, माजी नगरसेवक किशोर वनवारी, टिम ओमी कलानीचे जाहीर उमेदवार इंदर गोपलानी, हरी कनोजिया, कुमार चौनानी, काँग्रेसचे माजी युथ अध्यक्ष कुलदिपसिंग माथारू, अखिल भारतीय सफाई मजदूरर काँग्रेसचे चरणसिंग टाक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

रिपाइंला भगदाड

मागील दहा वर्षात जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नाना बागुल यांनी रिपाइं आठवले गटाला नवसंजिवनी दिली होती. तीन वर्षापूर्वी पक्षाने त्यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेत नगरसेवक भगवान भालेराव यांच्याकडे दिले होते. त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. रिपाइंच्या बालेकिल्ल्यात नाना बागुल आणि पुष्पा बागुल यांच्या रूपाने शिवसेनेने मुसंडी मारली आहे. याच परिसरातील साई पक्षाचे नगरसेवक अंकुश म्हस्के व राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी बेहनवान यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पवई, शांतीनगर आणि चौपडा या परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Related posts: