|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शिवसेनेकडून भाजपला ढेकणाची उपमा

शिवसेनेकडून भाजपला ढेकणाची उपमा 

ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा भंगणार नाही

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर शरसंधान

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती तोडल्यानंतर शिवसेनेने भाजपला ढेकणाची उपमा दिली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’च्या शनिवारच्या अग्रलेखातून भाजपची सत्तांध, हिंदूद्रोही आणि कपटी अशी संभावना करण्यात आली आहे. शिवसेना हा कधीही न विझणारा ज्वालामुखी आहे. भविष्यात या ज्वालामुखीत अनेकांच्या समिधा पडतील. त्यामुळे शिवसेनेच्या वाटय़ाला उगाच जाऊ नका, असे शिवसेनेने बजावले आहे.

शिवसेना ही नेहमीच कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहिली आहे. मागणाऱयांच्या रांगेत ती भिकेचा कटोरा घेऊन कधीच उभी राहिली नव्हती. आम्ही मागत राहिलो ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापि भंगणार नाही, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

विधानसभा निवडणुकीत युती संपली होती. उरले होते ते फक्त संबंध. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी आम्हाला एक मिणमिणती आशा होती. पण, सत्तांध मंडळींनी त्या मिणमिणत्या आशेवरही शेवटची फुंकर मारली. त्यांना सत्ता आणि पैशाच्या जोरावर सर्वकाही जिंकायचे होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चूड लावून गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या छाताडावर नाचून राक्षसी विजयोत्सव साजरे करायचे होते. आम्हाला फक्त आमचा महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचे रक्षण करायचे होते. त्यासाठी घाव झेलायला आमची छाती तयार होती, पण घाव पाठीवर झाले, अशी घणाघाती टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कमळ धरणारे हात शोधावे लागत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी एका हातात मशाल आणि दुसऱया हातात कमळ धरून पुढे जाण्याचा आदेश दिला. पण, उपकारकर्त्यांच्या पाठीत वार करणाऱयांना सगळय़ांचा विसर पडला आहे. 25 वर्षापूर्वी ज्या प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्वाच्या विचारातून युती झाली तो विचार आज गुंजभरही उरलेला नाही. निवडणुकीतील जागावाटप हा मुद्दा आमच्यासाठी गौण आहे. दोन जागा त्यांच्या वाढल्या आणि आमच्या वाटय़ाला कमी आल्या म्हणून छाती पिटून आक्रोश करणाऱयातील आम्ही नव्हतो, असे अग्रलेखात म्हटले आहे.

शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि युती धर्म पाळला. पण, त्यांच्या मनात धर्म नव्हता तर कपट होते. तसे नसते तर प्रत्येक निवडणुकीकडे त्यांनी जनतेच्या हितापेक्षा स्वत:ला पसरण्याची संधी म्हणून पाहिले नसते.’

सामना अग्रलेख

Related posts: