|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपने गोव्याला लुटण्याचे काम केले

भाजपने गोव्याला लुटण्याचे काम केले 

प्रतिनिधी/ मडगाव

भाजने गेल्या पाच वर्षात गोव्याला लुटण्याचे काम केले. त्याचबरोबर गोव्याला विकासाच्या बाबतीत पिछाडीवर सोडल्याचा आरोप युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तन्वीर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तन्वीर सद्या काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी गोव्यात आले आहेत. 2012 मध्ये भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी राज्यातील जनतेला अनेक आश्वासन दिली. पण या आश्वासनाची पूर्तताच केली नाही, लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्ता प्राप्त केली. मात्र, भाजपचा असली चेहरा सद्या जनतेसमोर आला असून जनता यावेळी भाजपला धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोव्यातील मध्यमवर्गीय, शेतकरी व कामगार वर्गाकडे सरकारने गेल्या पाच वर्षात लक्ष दिले नाही. गोव्याला खास दर्जा देण्याचे आश्वासन दिले. पण आश्वासनाची पूर्तताच केली नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. याच्या उलट केंद्रात व राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर असताना लोकांचे सशक्तीकरण केले, सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला त्याचबरोबर माहिती हक्क कायदा देखील उपलब्ध करून दिल्याचा दावा केला.

भाजपने लोकांना लाचार बनविले

भाजपने लोकांना उद्योग व्यवसायात प्रोत्साहन दिले नाही. उलट त्यांना लाचार बनविण्याचे काम केले, शेतकऱयांच्या घामाचा देखील व्यवस्थित मोबदला मिळाला नाही असे श्री. तन्वीर म्हणाले. काळे धन परत आणण्याची घोषणा केली. पण आज पर्यंत या घोषणेची पूर्तता करता आलेली नाही. भाजपला जे गेल्या पाच वर्षात जमले नाही ते काँग्रेस पाच वर्षात साध्य करून दाखविणार असल्याचा दावा देखील केला.

लोकशाही पद्धतीने मुख्यमंत्री निवडणार

काँग्रेस पक्षाने नेहमीच लोकशाहीला पसंती दिली आहे. गोव्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास लोकशाही पद्धतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीत काहीच काम नसते, त्यामुळे ते वारंवार गोव्यात येतात व येथील सरकार चालवितात असा आरोप त्यांनी केला. ‘आप’चे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बिनखात्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते देखील जिथे निवडणुका होतात, त्या ठिकाणी धाव घेतात व जनतेची दिशाभूल करतात असा आरोप केला.

या पत्रकार परिषदेला अविनाश तावारीस, स्वाती केरकर व श्री. पवन उपस्थित होते.

 

Related posts: