|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुठ्ठाळी मतदारसंघातील आवश्यक गरजांची पुर्तता करू मगोच्या उमेदवाराचे आश्वासन

कुठ्ठाळी मतदारसंघातील आवश्यक गरजांची पुर्तता करू मगोच्या उमेदवाराचे आश्वासन 

प्रतिनिधी/ वास्को

कुठ्ठाळी मतदारासंघातील म.गो.पक्षाच्या उमेदवार सुमन शर्मा यांनी कुठ्ठाळीतून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून कुठ्ठाळीतील आवश्यक गरजांची पूर्तता करू असे आश्वासन दिले. मतदारांचा आपल्याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचा दावा त्यांनी केला. मगो पक्षाच्या कुठ्ठाळी मतदारसंघाच्या जाहीरनाम्याचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

सुमन शर्मा या मगो पक्ष, गोवा सुरक्षा मंच व शिवसेना युतीच्या उमेदवार असून त्या झुआरीनगरातील रहिवासी आहेत. तसेच त्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करीत असतात. त्यांनी शनिवारी संध्याकाळी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करून निवडणुक लढवण्यामागील उद्देश स्पष्ट केला. सुमन शर्मा यांनी कुठ्ठाळी मतदारसंघात घरोघरी प्रचारावर भर दिलेला असून मतदारांकडून आपल्याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. आपल्या विजयाचा दावा करताना कुठ्ठाळी मतदारसंघातील आवश्यक गरजांची आपण पूर्तता करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी अभय खवटे, सिद्धेश्वर मिश्रा, नितीन फळदेसाई, प्रचार प्रमुख अनिता तिळवे व निखिल शर्मा उपस्थित होते. उमेदवार सुमन शर्मा यांनी झुआरीनगर बीर्ला भागात आपण अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करीत असल्याचे सांगून कुठ्ठाळी मतदारसंघाचा विकास झालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मगो पक्षाने आपल्याला उमेदवारी देवून व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. या संधीचा आपण पुरेपूर लाभ घेऊन कुठ्ठाळी मतदारसंघाच्या विकासासाठी झटणार असे त्यांनी सांगितले. कुठ्ठाळी मतदारसंघात मुलांना खेळण्यासाठी उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग पार्क, युवकांसाठी खुले मैदान, पाळणा घर आदी सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. झुआरीनगर भागात शौचालयांची कमतरता आहे. या मतदारसंघात भूगटार वाहिनीची जोडणी, वीज व पाण्याची जोडणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.  युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षणाची सोय, महिलांसाठी स्वयंसाहाय्य गटाची स्थापना, स्वच्छतेसाठी उपाययोजना आदी समस्या सोडविणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. या मतदारसंघात काही ठिकाणी घर मालक जमींनींचे मालक नाहीत. त्यांच्या घरांच्या जमीनी घरमालकांच्या नावे करण्याचा आपल्या पक्षाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. कुठ्ठाळी मतदारसंघात आरोग्य सुविधांचीही कमतरता असून या सुविधा उपलब्ध करण्यासाठीही आपण प्राधान्य देईन असे त्या म्हणाल्या.

Related posts: