|Friday, August 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » अजरामर चित्रपटांच्या चित्रपटनिर्मितीचा प्रवास पुस्तकात

अजरामर चित्रपटांच्या चित्रपटनिर्मितीचा प्रवास पुस्तकात 

भारतीय चित्रपटांच्या इतिहासात कायमच अजरामर ठरलेल्या दहा दर्जेदार हिंदी चित्रपटांच्या संपूर्ण निर्मितीचा प्रवास कथन करणाऱया दहा क्लासिक्स या पुस्तकाचे प्रकाशन मनसेचे अध्यक्ष आणि चित्रपट रसिक असलेले राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ाला नामवंत चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा, नामवंत दिग्दर्शक निशिकांत कामत आणि चित्रपट अभ्यासक आणि ज्येष्ठसमीक्षक अमोद मेहरा यांच्या साक्षीने हा प्रकाशन सोहळा प्रभादेवीच्या कोहिनूर पार्क हॉटेलमध्ये संपन्न झाला. कायमच रसिकांच्या मनात अजरामर असलेल्या या दहा हिंदी चित्रपटांच्या संपूर्ण निर्मितीची प्रक्रिया यात अनिता पाध्ये यांनी तपशीलवार लिहिली आहे. या चित्रपटांना सर्वोत्तम असे का म्हणतात याचेही उत्तर या निमित्ताने नव्या पिढीला मिळाले असून हा चित्रपट इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे. अत्यंत ओघवत्या शैलीत आणि रंजक पद्धतीने या चित्रपटांचा आजवर माहिती नसलेला तपशीलही यात रसिकांना वाचायला मिळणार आहे. विशेष म्हणजे लोकप्रिय चित्रपटांचे ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.

या प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी नेमके काय घडले आणि कसे घडले होते याबद्दल सिनेमाच्या चाहत्यांना मोठे कुतूहल वाटत असते. तोच अनोखा तपशील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि अभ्यासकांना सुद्धा संदर्भ म्हणून उपयोग व्हावा हा या पुस्तक लेखनामागचा मुख्य हेतू आहे असे अनिता पाध्ये यांनी याप्रसंगी सांगितले. यासंदर्भात आपण दोन वर्ष संशोधन केले. तसेच या काळात आपण चित्रपटाशी संबंधित असलेल्या पन्नासांहून अधिक जणांना प्रत्यक्ष भेटून आजवर कधीही उजेडात आली नव्हती अशी माहिती मिन्वली आणि त्याच्या आधारे या पुस्तकाचे लेखन केले असेही त्यांनी बोलून दाखवले.

‘दहा क्लासिक्स’ या पुस्तकात बलराज सहानी अभिनीत आणि बिमल रॉय दिग्दर्शित दो बिघा जमीन, 1957 मध्ये झळकलेला गुरू दत्तचा ‘प्यासा’, ग.दि. माडगूळकरांची कथा असलेला आणि व्ही. शांताराम यांचा दो आँखे बारह हाथ, नर्गिस, राजकुमार, राजेंद्रकुमार, सुनील दत्त यांचा आणि मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया, प्यार किया तो डरना क्या हे अनारकलीचे शीश महलमधले रसिकप्रिय गीत असलेला के. आसिफ दिग्दर्शित मुघल ए आझम, देव आनंद आणि वहिदा रेहमान जोडीचा तसेच सचिनदेव बर्मन यांच्या संगीतांसाठी आणि अप्रतिम दिग्दर्शनासाठी ओळखला गेलेला विजय आनंदचा गाईड, राजकपूर वहिदा रेहमान जोडीचा आणि बासू भट्टाचार्य दिग्दर्शित तिसरी कसम, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सुमिता सन्याल, जॉनी वॉकर अशा कलाकारांचा हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद, राजकुमार, अशोककुमार, मीनाकुमारी यांच्या भूमिका असलेला कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’ आणि रेखाची प्रमुख भूमिका असलेला मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘उमराव जान’ या चित्रपटांच्या जन्मकथा यात समाविष्ट केल्या आहेत.