|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षण विभागाकडून अंशदायी पेन्शनमध्ये 15 लाखाचा अपहार!

शिक्षण विभागाकडून अंशदायी पेन्शनमध्ये 15 लाखाचा अपहार! 

कणकवलीअंशदायी पेन्शन योजनेमध्ये शिक्षण विभागाकडून सुमारे 15 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप पं. स. सदस्य संतोष कानडे यांनी केला. यावर अपहार झाला असेल, तर त्याच्या मूळापर्यंत जाऊन चौकशी केली जाईल. याबाबत येत्या 2 फेब्रुवारीला संबंधित अधिकाऱयांसोबत बैठक आयोजित करण्यात आल्याचे उपसभापती महेश गुरव यांनी सांगितले.

कणकवली पं. स. ची मासिक बैठक बुधवारी पं. स. च्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपसभापती महेश गुरव होते. बैठकीला गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपस्थित होते. बैठकीला अनेक सदस्यांची अनुपस्थिती होती.

कानडे यांनी शिक्षण विभागावर घणाघाती आरोप केला. अंशदायी पेन्शन योजना मध्यंतरी बंद करण्यात आली. ती परत चालू करण्यात येणार असल्याचे समजते. त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर हा विषय राज्यभराशी संबंधित असल्याचे उत्तर संबंधित विभागाकडून देण्यात आले. त्यावर कानडे यांनी, या योजनेत 15 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप केला.

अंशदायी पेन्शन योजनेबाबत मागील बैठकीत प्रश्न उपस्थित केला, तेव्हा पुढील बैठकीत उत्तर देण्याचे आश्वासन तत्कालिन गटविकास अधिकारी यांनी दिले होते, असेही कानडे म्हणाले. मात्र, सध्या गटशिक्षणाधिकारी रजेवर असल्याचे संबंधित खातेप्रमुखाने सांगितले. गुरव यांनी याप्रश्नी 2 फेब्रुवारीला संबंधित अधिकाऱयांच्या उपस्थितीत खास बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले.

देव – देवतांचे फोटो कार्यालयांमध्ये लावण्यास मनाई करण्याबाबतचा शासन निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. या निर्णयाद्वारे राज्य सरकार दुजाभाव करीत आहे. या निर्णयास आपला विरोध राहणार असल्याचे सदस्य बाबा वर्देकर म्हणाले. त्यावर, याबाबतची अधिकृत सूचना सभागृहाला अद्याप तरी प्राप्त नाही. तशी सूचना प्राप्त होईल तेव्हा त्यावर सभागृहात चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे गुरव म्हणाले.

तालुक्यातील पाणीटंचाईशी संबंधित कामांबाबतही चर्चा झाली. यामध्ये प्रस्तावित कामे, मंजूर कामांची माहिती संबंधित खातेप्रमुखांकडून घेतानाच मंजूर कामे मार्गी लावण्याच्या सूचना गुरव यांनी दिल्या. डॉ. कुबेर मिठारी यांनी, लवकरच होणाऱया पल्स पोलिओ कार्यक्रमाची माहिती दिली व त्यात पं. स. च्या सहकार्याची अपेक्षा केली. एमएसईबीच्या विकासकामांबाबतही चर्चा झाली.