|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुख्यमंत्री गुंडांचे नेते वाटतात

मुख्यमंत्री गुंडांचे नेते वाटतात 

प्रतिनिधी/ मुंबई

भाजपच्या शनिवारच्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना खंडणीखोर, कौरव असे तर संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना दुर्योधन, शकुनीमामा अशी उपमा देत औकात दाखविण्याची भाषा केली होती. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

भाजपचा हा कार्यक्रम म्हणजे कोकणातील दशावताराचा भाग होता. लायकी नसताना स्वत:ला स्वत:च कृष्ण म्हणून घेतल्याने ते कृष्ण ठरत नाहीत. मुख्यमंत्र्यांभोवतीच गुंड असल्याने ते गुंडांचे नेते वाटतात, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली.

रविवारी मातोश्रीवर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र आंबेरकर यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक चांगली प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूलाच गुंड आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री नाही गुंडाचे नेते वाटत असून, त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली.

21 फेब्रुवारीला आम्ही आमची औकात दाखवू असे मुख्यमंत्री म्हणाले होते; यावर बोलताना मुंबईची जनताच त्यांना त्यांची औकात दाखवेल, असे ठाकरे म्हणाले. आमच्या पारदर्शकतेच्या मुद्दय़ावर त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. पारदर्शकतेचा मुद्दाही त्यांचाच होता; पण मी आता त्यावर जास्त बोलणार नाही, नाहीतर माझाच घसा बसेल, असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

मी माझ्या भाषणात म्हटले होते की, गुंडाने मावळ्याचा वेष घातल्याने तो गुंड मावळा होत नाही. तसे कृष्णाचे सोंग घेतल्याने किंवा स्वत:ला कृष्ण म्हटल्याने कृष्ण होत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राममंदिर केव्हा बनविणार ?

बाबरी मशिदीच्या पाडापाडीनंतर विखुरलेले आता केंद्रात सत्ता आल्याने गोळा होत आहेत. त्यावेळी पाडलेल्या विटा शोधत आहेत. त्यांना विटा सापडल्या की ते राममंदिर बांधतील, पण मंदिर कधी बांधणार ते सांगत नाहीत. आता त्यांना अच्छे दिन कधी येणार हे कोणीही विचारत नाही. या सगळ्यांचे मुखवटे उतरले आहेत, बुरखे फाटले आहेत, त्यांचे थापाडे चेहरे उघड झाले आहेत. त्यांना आमच्यावर काय टीका करायची ती करू द्या. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमची कामे खोडून दाखवावित, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

Related posts: