|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पालिकेच्या 1 लाख कोटी रकमेचे ऑडिटच नाही

पालिकेच्या 1 लाख कोटी रकमेचे ऑडिटच नाही 

पालिकेतील घोटाळ्यांची यादी मुंबई काँग्रेसच्या आरोप पत्रात

‘मन बदला.. मुंबई बदलेल..’ मुंबईकरांना काँग्रेसचे भावनिक आवाहन

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आरोप संग्राम सुरू झाला असून मुंबई काँग्रेसने महानगरपालिकेतील घोटाळ्याची यादीच सोमवारी आरोपपत्रातून मुंबईकरांसमोर ठेवली. आरोपपत्राचे प्रकाशन काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या हस्ते करण्यात आले. गेली वीस वर्षे मुंबईवर शिवसेना-भाजप राज्य करत आहे. मात्र, सर्वसामान्य मुंबईकरांना मुलभूत सुविधाही मिळाल्या नाहीत असे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी ‘खरंच ही जगप्रसिध्द मुंबई आहे का?’ असा भावनिक सवाल या आरोपपत्रातून विचारला आहे.

रस्ते घोटाळा, टॅबलेट घोटाळा, नालेसफाई घोटाळा, डंपिंग ग्राऊंड घोटाळा असे

प्रत्येक खात्यात कोटय़वधीचे घोटाळे असतानाही अर्थसंकल्पातील 1,00,000 करोडपेक्षा अधिक रकमेचे ऑडिट आजवर झालेले नसल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.

ऑडिट महत्त्वाचे का?

मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ऑडिटर्सनी 25 टक्के अर्थसंकल्पाचे परिक्षण करणे बंधनकारक असताना संपूर्ण अर्थसंकल्पाचा 2 टक्के ते 3 टक्के अर्थसंकल्पाचे परिक्षण केले असल्याचा दावा काँग्रेसच्या या आरोप पत्रात करण्यात आला आहे. 2007 ते 2010 पर्यंतच्या वार्षिक आर्थिक अहवालाचे अद्याप ऑडिट झाले नाही. 2011 मध्ये महापालिकेच्या बॅलन्सशीटमध्ये करोडो रुपयांचा फरक आहे. 2011 मध्ये महापालिकेने गोळा केलेल्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये देखील 2 वेगवेगळे आकडे आहेत. यात कोटय़वधी रुपयांचा फरक आहे. 2016 मध्ये रोड संबंधित केलेल्या 200 चौकशांपैकी फक्त 5 चौकशा पूर्ण झाल्या असल्याचे यात म्हटले आहे.

   ब्रिम्स्टॅवेडच्या अंतिम मुदती संपल्या.

ब्रिम्स्टॅवेड योजनेचा प्राथमिक प्रस्तावित खर्च 1200 कोटी होता. सध्याचा सुधारीत खर्च 4 हजार कोटी होणार आहे. यासाठी दिलेल्या दोन अंतिम मुदती संपल्या. आता नविन अंतिम मुदती संपण्याच्या मार्गावर आहेत.

  पाणी घोटाळा

पाणी खात्याचा 5 वर्षाचा खर्च अंदाजे 10 हजार कोटी. मात्र, मुंबईकरांना 50 ते 60 पट जास्त पैसे मोजावे लागतात. मागील दहा वर्षात दीड हजार कोटी खर्च करुन फक्त 15 टक्के पाण्याच्या लाईन्स दुरुस्त केल्या. पाणी सर्वाना मिळत नसूनही टँकर माफियांवर 2052 कोटी खर्च मुंबईकरांच्या पैशातून होत आहे. तरीही 30 टक्के पाण्याची चोरी आणि गळती थांबत नाही. 2012 पर्यत पुरेसे पाणी देण्याचे वचन विसरले. 83 टक्के साथीचे रोग दुषित पाण्यामुळे होत आहे. महापालिकेच्या पाणी विभागावर 500 कोटींचा काळाबाजार करणाऱया टँकर माफियाला मदत करत असते.

रस्ते घोटाळा

मुंबई महापािलकेच्या ताब्यात एकूण 1950 किमीचे रस्ते असून मागील दहा वर्षात यावर 28 हजार कोटी खर्च केले. यावर्षी 13 पट जास्त खड्डे पडले. त्यामुळे 22 हजार अपघात झाले. मुंबईत रोज 40 ते 50 अपघात होतात. गत पाच वर्षात रस्तेदुरुस्तीवर झालेल्या खर्चात 1,950 किमीचे नवीन आणि कायमस्वरुपी रस्ते तयार झाले असते. रस्त्यातील खड्डयांचा घोटाळा रुपये 9 हजार कोटींवर पोहचला आहे.

 डंपिंग ग्राऊंड घोटाळा

काँग्रेस सत्तेवर असताना सरकारने मुंबई बाहेर 110 हेक्टर जागा डंपिंग
ग्राऊंडसाठी देण्याचे मंजूर केले होते. मात्र भाजपा सरकार अद्याप ती जागा देत नाही. घनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये 10 हजार कोटींच्या घोटाळ्याला जबाबदार कोण असल्याचा सवाल केला. 2011 च्या दहा हजार कोटी रुपये कचरा घोटाळ्यात राजकारणी व अधिकाऱयांचा समावेश आहे. मुंबईत 70 टक्के कचरा विना प्रक्रिया डंप केला जात असल्याचे सांगण्यात आले.

टॅबलेट घोटाळा

टॅबलेटसाठी महापालिकेच्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या 20 हजार 700 आहे. महापालिकेने 22 हजार 799 टॅबलेट खरेदी केले. प्रति टॅबलेट 6 हजार 850 रुपये प्रमाणे आहेत. मात्र खरेदी केलेले टॅबलेट जुने असून त्यात वायफाय किंवा 3 जी नसल्याचे सांगण्यात आले. चीनी बनावटीचे टॅबलेट व्हिडीयोकॉन कंपनी कडून खरेदी दाखवून यावर 15,61,73,150 खर्च दाखविण्यात आला आहे.

अनधिकृत बांधकामांच्या फाईली गायब

2012मध्ये शिवसेना-भाजपाच्या युतीने मुंबईतील इमारतींना ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्याचे वचन दिले मात्र वचन पूर्ण न केल्याने प्रापॅपर्टी ऍक्स भरमसाट वाढला. तर 2013 मध्ये अनधिकृत बांधकामाच्या 6 हजार फाईल्स गायब आहेत.

आरोग्या बाबत अनास्था

25 हजार कोटी खर्च करुनही मागील 20 वर्षात व्हेटिलेटर अभावी 30 हजार रुग्णांना परत पाठवले. डेंग्यू रुग्णांची संख्या 2011 ते 2016 पर्यत आठ पटीलने वाढली. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात 19 टक्के कर्मचाऱयांची कमतरता आहे. घाईघाईत सुरु केलेले शिवसेनाप्रमुखांच्या नावाने सुरु केलेले ट्रॉमा केअर हॉस्पिटल अपूर्णावस्थेत असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: