|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » वारसदारांच्या राजकीय प्रवेशाची धडपड

वारसदारांच्या राजकीय प्रवेशाची धडपड 

सध्या राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातील

प्रस्थापितांनी आपल्या वारसदारांच्या राजकीय एंट्रीसाठी धडपड चालवली आहे. या निवडणुकीत पक्षाने आपल्या पुत्राला, कन्येला, पत्नीला किंवा भावाला तिकीट द्यावे म्हणून या बडय़ा नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.

मुंबई / प्रतिनिधी

जनतेला राजकारणातील घराणेशाही आता नवी राहिलेली नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकारणाला हळूहळू घराणेशाहीचा विळखा बसू लागला आहे. केंद्र अथवा राज्याच्या राजकारणात एखादा नेता प्रस्थापित झाला की तो आपल्या वारसदारासाठी नवी राजकीय स्पेस शोधतो. ग्रामपंचायत ते महापालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही स्पेस हमखास सापडते. सध्या राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातील प्रस्थापितानी आपल्या वारसदारांच्या राजकीय एंट्रीसाठी धडपड चालवली आहे. या निवडणुकीत पक्षाने आपल्या पुत्राला, कन्येला, पत्नीला किंवा भावाला तिकीट द्यावे म्हणून बडय़ा नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले की नाही हे लवकरच कळेल.

शिवसेनाभाजपला घराणेशाहीची लागण

काँग्रेसमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका करणाऱया शिवसेना आणि भाजपची घराणेशाहीची सुटका झालेली नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्या घरातच तिकीट मिळावे म्हणून भाजपचे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार यांनी प्रयत्न चालवले आहेत.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घाटकोपरमधून आपले चिरंजीव हर्ष यांच्यासाठी तिकीट मागितले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्हा परिषद निवडणुकीत भाऊ भास्कर यांचे तिकीट निश्चित केले आहे. महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर या आपले सुपूत्र दीपकसाठी कांदिवलीतून प्रयत्नशील आहेत. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुलुंडमधून मुलगा नीलसाठी उमेदवारी मागितली आहे. याशिवाय किरीट यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांची दादरमधील उमेदवारीची चर्चा जोरात सुरू आहे. माजी राज्यमंत्री राज पुरोहित यांनी मुलगा आकाशसाठी उमेदवारीवर दावा केला आहे. मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते आणि विधानपरिषद सदस्य आर. एन. सिंह यांनी वाकोल्यातून आपल्या मुलाच्या तिकिटाचा आग्रह धरला आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेसाठी मुलगा राहुलचे नाव पुढे केले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार रमेशसिंह ठाकूर यांनाही आपल्या मुलाच्या तिकिटाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपत आलेले विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी आपल्या बंधूंची उमेदवारी नक्की केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असताना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणातील गुन्हेगारीकरणाच्या विरोधात लढा दिला होता. माजी आमदार पप्पू कलानीचे दाखले देत मुंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. आता त्याच भाजपने उल्हासनगरची सत्ता मिळवण्यासाठी पप्पू कलानी यांचे चिरंजीव ओमींशी हात मिळवणी केली आहे. पप्पू कलानींच्या पत्नी ज्योती या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. आता त्यांचे चिरंजीव ओमी यांनी भाजपच्या मदतीने उल्हासनगर महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करण्याची तयारी चालवली आहे.

काँग्रेस नेत्यांची मोर्चेबांधणी

2004 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एकनाथ गायकवाड यांनी विधानसभेचा धारावी मतदारसंघ आपल्याच घरात राहील याची काळजी घेतली. मुलगी वर्षाला धारावीतून विधानसभेत पाठवल्यानंतर गायकवाड यांनी मुलगा तुषारला महापालिकेत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी चिरंजीव प्रथमेशला गेल्या निवडणुकीत महापालिकेवर पाठवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या प्रयत्नात अपयश आले असले तरी कोळंबकर यांनी पुन्हा प्रथमेशच्या तिकिटसाठी प्रयत्न चालवले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह हेही मुलाला महापालिकेचे तिकीट मिळावे म्हणून फिल्डींग लावून आहेत. राष्ट्रवादीत मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या बहिणीला महापालिकेचे तिकीट मिळवून दिले आहे.

धीरज देशमुखांची राजकीय इनिंग

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज हे आपली राजकीय इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धीरज यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. धीरज यांचे मोठे बंधू अमित लातूरचे आमदार आहेत. तर दुसरे बंधू रितेश हे सिनेमासृष्टीत आहेत. विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात ग्रामपंचायतीपासून केली. बाभुळगावचे सरपंच म्हणून काम करणाऱया विलासरावांनी राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत झेप घेतली होती. त्यामुळे धीरज यांच्या राजकीय इनिंगची लातूरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Related posts: