|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेस-सप आघाडीला मुलायम यांचा विरोध

काँग्रेस-सप आघाडीला मुलायम यांचा विरोध 

काँग्रेस उमेदवारांविरोधात उतरू शकतात समर्थक

वृत्तसंस्था/ लखनौ

मुलायम आणि अखिलेश यांच्यातील कलह संपुष्टात येण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. सोमवारी दिल्लीत मुलायम सिंग यादव यांनी पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली. काँग्रेसच्या 105 उमेदवारांविरोधात अर्ज भरावा, काँग्रेस-सप आघाडीसाठी प्रचार करणार नाही असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. उत्तरप्रदेशात दोन टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. अशा स्थितीत पुढील 5 टप्प्यांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांना मुलायम यांच्या समर्थकांचा सामना करावा लागू शकतो.

काँग्रेस विरोधात सप उभा करण्यासाठी मी आयुष्यभर झटलो. अजूनही या आघाडीविरोधात अखिलेशला समजाविण्याचा प्रयत्न करत आहे. ही आघाडी पक्षाला संपवेल. 105 जागांवर आमचे नेते आणि कार्यकर्ते काय करणार? सर्वांनी मेहनत केली होती, आता त्यांचे काय होणार? हे अयोग्य असून मी पक्ष संपू देणार नाही असे मुलायम यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले.

आघाडीला विरोध

रविवारी राहुल-अखिलेश यांच्या संयुक्त पत्रकार परिषद आणि रोड शोनंतर मुलायम यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला होता. मी या आघाडी विरोधात असून प्रचारात भाग घेणार नाही. आघाडीच्या विरोधात कार्यकर्त्यांनी उभे राहून जनतेपर्यंत आपले म्हणणे पोहोचवावे असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले होते. सप जर स्वबळावर लढला असता तरी त्याला विजय मिळाला असता. या आघाडीची गरजच नव्हती असा दावा त्यांनी केला.