|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » एटीएमधारक, व्यापाऱयांना दिलासा

एटीएमधारक, व्यापाऱयांना दिलासा 

एटीएममधून दिवसाला काढा 24 हजार : रिझर्व्ह बँकेकडून मर्यादेमध्ये सुधारणा :

मुंबई / वृत्तसंस्था

एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेकडून सोमवारी जाहीर करण्यात आला. आता एटीएमधारकांना एटीएममधून दिवसाला 24 हजार रुपये काढता येणार आहेत. एटीएमधारकांना दिलासा देण्याबरोबरच करंट अकाऊंट (चालू खाते), कॅश क्रेडीट खाते, ओव्हरड्राफ्ट अकाऊंटवरील मर्यादा हटविण्याची घोषणाही रिझर्व्ह बँकेने केली असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे बचत खातेधारक आणि छोटय़ा व्यापाऱयांना दिलासा मिळाला आहे. एटीएमसंबंधीच्या नव्या नियमांची अंमलबजावणी 1 फेबुवारीपासून होणार आहे.

बचत खातेधारकांना यापूर्वी एटीएममधून दिवसाला केवळ 10,000 रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. त्यात आता बदल करून दिवसाला 24 हजार रुपये काढण्याची अनुमती देण्यात आली आहे. मात्र आठवडय़ाच्या मर्यादेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे आठवडय़ालाही केवळ 24 हजार रुपयेच काढता येणार आहेत. आठवडय़ाच्या मर्यादेत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नसून पैशांचा पुरवठा पाहून त्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आली आहे.

करंट अकाऊंटधारकांना आठवडय़ाला आता अमर्याद पैसे काढता येऊ शकतील. ही सुविधा ओव्हरड्राफ्ट (ओडी) आणि कॅश क्रेडिट अकाऊंटधारकांसाठीही उपलब्ध असेल, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. करंट अकाऊंटधारकांना यापूर्वी केवळ 1 लाख रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादा अधिक कडक करण्यात आली होती. 28 डिसेंबर 2016 रोजी रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजार रुपयांवरून 4,500 रुपये केली होती. याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2017 पासून सुरू झाली होती. त्यानंतर ही मर्यादा दिवसाला 10 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती.

Related posts: