|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हय़ात आठ ठिकाणी ‘चक्काजाम’

जिल्हय़ात आठ ठिकाणी ‘चक्काजाम’ 

सिंधुदुर्गनगरीपोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावूनही ‘चक्काजाम’ करण्यासाठी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे रस्त्यावर उतरलेल्या अनेक मराठा समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र गनिमी कावा पद्धतीने मुंबई-गोवा महामार्गावर जानवली-तरंदळे तिठा, कसाल पूल, ओरोस खर्येवाडी आणि वेताळबांबर्डे या चार ठिकाणी रस्त्यावर मातीचे ढिगारे, झाडे टाकून व टायर पेटवून चक्काजाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पोलिसांची तर चांगलीच त्रेधातिरपट उडाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात आमदार नितेश राणे यांच्यासह 164 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी यापूर्वी संपूर्ण राज्यभर मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आले. त्यानंतर मंगळवारी चक्काजाम आंदोलन जाहीर करण्यात आले होते. परंतु जिल्हय़ात सध्या मनाई आदेश लागू असल्याने आणि निवडणूक आचारसंहिता असल्याने पोलिसांनी मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा काढल्या होत्या.

पोलिसांनी नोटिसा काढल्याने मराठा समाज बांधवांमध्ये काहीशी चलबिचल झाली. तरीही ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. महामार्गावर कणकवली पटवर्धन चौक येथे आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. एकूण 34 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. कुडाळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक ऍड सुहास सावंत यांच्यासह 90 जणांना ताब्यात घेण्यात आले. सावंतवाडीत 30, तर दोडामार्गमध्ये 10 जणांना मिळून जिल्हय़ात एकूण 134 जणांना मुंबई पोलीस अधिनियम 149 अन्वये ताब्यात घेऊन काही काळानंतर सोडून देण्यात आले.

पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावलेला असतानाच मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवत काही ठिकाणी चक्काजाम केलेच. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावरील कसाल पुलावर मातीचे ढिगारे ओतल्याने दुपारी 11.40 ते 12.20 पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. मातीचे ढिगारे ओतण्यात आल्याचे कळताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, निवासी पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे यांच्यासह पोलीस कुमक तेथे दाखल झाली. पोलिसांचे जलद कृती दलही दाखल झाले. प्रथम एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर कसालचे पोलीस पाटील अनंत कदम व अन्य पोलिसांनी माती बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली. तसेच ओरोस खर्येवाडी आणि जानवली तरंदळे तिठा येथे रस्त्यावर झाडे तोडून चक्काजाम करण्यात आले. वेताळबांबर्डे येथे टायर पेटवून चक्काजाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चारही ठिकाणी पोलिसांनी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली. पावशी येथेही वाळू टाकून चक्काजाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Related posts: