|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वाढीव शुल्काविरोधात रिक्षाचालक एकवटले!

वाढीव शुल्काविरोधात रिक्षाचालक एकवटले! 

 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

केंद्र सरकारच्यावतीने वाहतूकदारांवर अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. त्या धोरणामुळे देशभरातील वाहतूकदार आर्थिक खाईत सापडले आहेत. या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनात रत्नागिरीतील सर्व रिक्षा संघटनांनीही मंगळवारी 24 तासांचा बंद पाळला. शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार न केल्यास संपूर्ण कोकणात तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान या रिक्षा बंदमुळे नागरिकांचे हाल झाले.

केंद्र शासनाने केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील विविध वाढीव शुल्क व दंडाचे धोरण लागू केले आहे. 29 डिसेंबर 2016 पासून अचानक शुल्क भरमसाठ प्रमाणात वाढवलेले आहे. हे शुल्क आकारताना प्रशासनाने स्थानिक स्तरावर त्या बाबत प्रसिध्दी देऊन मुदत देण्याची अपेक्षा वाहतूकदारांनी व्यक्त केली. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अचानक नियम आणून वाहतूकदार व्यावसायिकांना नाहक भुर्दंड पडला आहे. वाहनांची विमा रक्कम सुध्दा बऱयाच प्रमाणात वाढवली आहे.

या गोष्टींची अंमलबजावणी करताना त्यांनी मोठय़ा शहरांशी तुलना करून लहान गावांतील रिक्षा व्यावसायिकांची चेष्टा केल्यासारखे आहे. या केंद्राच्या वाहतूक धोरणाविरोधात साऱया देशभरातील वाहतूकदार संघटनांनी मंगळवारी चक्काजाम आंदोलन पुकारले होते. त्यामध्ये रत्नागिरीतील रिक्षा सेना, रत्नदुर्ग रिक्षा संघटना, आदर्श रिक्षा संघटना, स्वाभिमान संघटनांनी सहभाग घेतला होता. या दिवशी दिवसभर रिक्षा व्यवसाय बंद ठेवला होता. शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ सर्व रिक्षा संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी प्रशासनाला मागणींचे निवेदन सादर करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी अविनाश कदम, प्रताप भाटकर, सलीम जमादार, रवींद्र शिवलकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद शेरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, माजी नगरसेवक संजू साळवी आदी उपस्थित होते.

             संगमेश्वर, कडवई, आरवलीत रिक्षा बंद आंदोलन

संगमेश्वर वार्ताहराने कळविल्यानुसार, केंद सरकारने रिक्षाच्या विविध शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. परिवहन करवाढीच्या विराधात संगमेश्वर तालुक्यातील रिक्षाचालकांनी कडकडीत बंद पुकारला. संगमेश्वर बसस्थानकाजवळील रिक्षा स्टँड, तुरळ, कडवई व आरवली या ठिकाणी रिक्षांनी बंद पाळल्याने रिक्षा स्ँटडमध्ये शुकशुकाट पसरला होता.

संगमेश्वरातील रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने पुकारलेल्या बंदला मोठय़ा प्रमाणात साथ मिळाली. सकाळपासूनच रिक्षाचालकांनी कडकडीत बंद पाळला. या ठिकाणी फलकावर निषेध व्यक्त करण्यात आला होता. तसेच आरवली, कडवई, कसबा, तुरळ आदी भागातील रिक्षाचालकांनी या बंदला साथ दिली. त्यामुळे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले.

 

Related posts: