|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहीद जवान रामचंद्र माने यांच्यावर अत्यंसंस्कार

शहीद जवान रामचंद्र माने यांच्यावर अत्यंसंस्कार 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

sशहीद रामचंद्र माने अमर रहेच्या घोषणा देत रामपूरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शहीद जवान रामचंद्र माने यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. माने याचा मुलगा संकेत याने मुखाग्नी दिली. पत्नी सुनिता आणि आई सुलाबाई यांनी फोडलेल्या हंबरडय़ामुळे सर्वांचे डोळे पाणावले.

काश्मिर खोऱयात शनिवारी बर्फाचा कडा कोसळून त्याखाली पाच जवान सापडले होते. त्यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील रामपूरवाडी येथील रामचंद्र शामराव माने यांचा समावेश होता. जखमी अवस्थेत माने यांना बाहेर काढण्यात आले, मात्र उपचार सुरु असताना त्यांचा सोमवारी मृत्यु झाला. शहिद माने यांचे पार्थिव जम्मुहून दिल्लीला आणि काल सायंकाळी दिल्लीहून बेळगावमध्ये आणण्यात आले. त्यानंतर आज सकाळी लष्कराच्या खास हेलिकॉप्टरने कवठेमहांकाळमधील महांकाली कारखान्याच्या मैदानावर आणण्यात आले.

कारखाना मैदानावर आ. सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक गणपती सगरे, नगरपंचायतीचे बांधकाम सभापती गजानन कोठावळे, युवक नेते शंतनू सगरे, बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, हणमंतराव देसाई, तहसिलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे उपस्थित होते. त्यानंतर माने यांचे पार्थीव रामपुरवाडीकडे नेण्यात आले.

कवठेमहांकाळ शहरातून अँब्युलन्समधून शहीद माने यांचे पार्थिव रामपुरवाडीकडे नेण्यात आले. शहरातील आणि हिंगणगाव, करोलीच्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. डिजीटल उभारण्यात आली होती. या गावांत लोकांनी गर्दी केली होती. आपल्या आवडत्या जवानास अखेरचा निरोप देण्यासाठी लोक मोठय़ा संख्येने जमले होते.

रामपुरवाडी गावांतून सजवलेल्या ट्रक्टरमध्ये पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. माने वस्तीवरील त्यांच्या घरी काहीवेळ पार्थिव ठेवण्यात आले. या ठिकाणी माने यांच्या पत्नी सुनिता, आई सुलाबाई, मुलगे संकेत आणि रोहन भाऊ भानुदास आणि अनिल यांच्यासह नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. घराजवळ नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला, जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पार्थिवास या ठिकाणी सलामी देण्यात आली.

नंदू उर्फ रामचंद्र माने यांचे माध्यमिक शिक्षण अग्रण धुळगावच्या एम.के. जाधव हायस्कूलमध्ये झाले. या हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी आणि रामपुरवाडीतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज माने यांच्या अंत्ययात्रेत्र सहभाग घेतला. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहीद नंदू माने अमर रहेच्या घोषणा दिल्या.

अंत्यसंस्काराच्या ठिकाणी राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माने यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्याचबरोबर आमदार सुमनताई पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, गणपती सगरे, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, शिवसेनेचे दिनकर पाटील, मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत शेजाळ, भाऊसाहेब पाटील, तानाजी यमगर, सुनील पाटील, विशाल वाघमारे, गटविकास अधिकारी सुभाष माने, पोपटराव भोसले, सुनिल माळी, पांडुरंग पाटील, गुलाब माने, जीवनराव भोसले, नारायणराव पवार, संभाजी गिड्डे, किसन पाटोळे, विनायक पाटोळे, विनायक मोटे, ज्ञानेश्वर गुरव, आकाराम पाटील, सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी रणजितसिंह सुर्यवंशी, सुभेदार बी.बी. भेरडकर, यांनी अंत्यदर्शन घेतले. सांगली पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रांताधिकारी विकास खरात, तहसिलदार शिल्पा ठोकडे, यांनी पुष्पचक्र अर्पण केले. चिप ऑफ आर्मी स्टाफच्यावतीने कर्नल व्ही.पी. शिंदे, सदर्न कमांडच्यावतीने कर्नल रॉबीन एब्राहिम, त्याचबरोबर सेन्याच्या विविध विभागाच्यावतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर बेळगावच्या मराठा लाईट इनफन्ट्रीच्या प्लाटूनने पार्थिवास बिगुल वाजवून सलामी दिली. त्यानंतर माने यांचा मुलगा संकेत (वय 9) याने मुखाग्नी दिली. त्याचवेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला. बंदुकीच्या तीन फरी हवेत झाडून पार्थिवास अखेरची वंदना करण्यात आली. त्यानंतर कर्नल रॉबिन एब्राहिम यांनी राष्ट्रध्वज पत्नी सुनिता यांच्याकडे सुपुर्द केला. पालकमंत्री सुभाष देशमुख, पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी माने यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. राज्य शासन शहीद माने यांच्या कुटुंबास वाऱयावर सोडणार नाही. पुर्णपणे मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी आमदार सुमनताई पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही माने यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मैदानावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. संजय हजारे, सरपंच मधुकर खोत, अनंत माने, विलास इमडे, प्रभाकर पाटोळे, जयदीप गडदे, अरुण गडदे आदी तरुण कार्यकर्ते सर्व नियोजन करीत होते.

Related posts: