|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चंदेरी दुनियेचा झगमगाट डोळय़ासमोर ठेवू नका!

चंदेरी दुनियेचा झगमगाट डोळय़ासमोर ठेवू नका! 

राजू चव्हाण/ खेड

केवळ चंदेरी दुनियेचा झगमगाट डोळय़ासमोर ठेवून मराठी चित्रपटसृष्टीत कोणी येवूच नये. एकतर कलावंत म्हणून स्वतःला सिद्ध करत असताना आपल्यातील शैक्षणिक गुणवत्तेवरही तितकाच भर द्यायला हवा. हीच खरी भविष्याची इन्व्हेसमेंट असते, असे मत गीतकार मंगेश कांगणे यांनी व्यक्त केले.

मराठी चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक सरस गाण्यांचा खजाना रसिकांना उपलब्ध करून देत फिल्मसिटीतील विविध पुरस्कारांसह फिल्मफेअर मराठी पुरस्कारात सर्वोत्तम गीतकाराचा बहुमान पटकावणारे कोकणचे सुपुत्र गीतकार मंगेश कांगणे हे वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानतर्फे आयोजित जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आले असता ‘तरूण भारत’शी गप्पा मारताना ते बोलत होते. या दरम्यान, त्यांनी गीतलेखनाचा प्रवास उलगडला. 

ते म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्याचे ठरवले नव्हतेच. मात्र, मराठी व हिंदी सिनेमांविषयी विशेष आवड होती. या चित्रपटांमधील गाण्यांचीही तितकीच  मोहिनी माझ्यावर पडली होती. यातूनच या चित्रपटांमधील गाणी स्वतःच्या ओठी गुणगुणत असतानाच सुरूवातीला चारोळय़ांची चटक लागून चारोळय़ा लिहिण्याचा जणू छंदच जडला. ग्रामीण भागातील विविध विषयांसह घडणाऱया घटनांवर चारोळय़ा करता-करता गीतलेखनाच्या प्रवासास सुरूवात कधी झाली हे उमगलेच नाही. मात्र, दुनियादारी चित्रपटातील टिक।़टिक।़ वाजते डोक्यात.. या गाण्याला तमाम रसिकांनी डोक्यावर घेतल्यानंतरच आपण खराखुरा गीतकार झाल्याची भावना जागृत झाली.

मात्र, या गाण्याचे सारे श्रेय माझ्या चिरंजीवाकडेच जाते. निवांतक्षणी घरी बसलेलो असताना फ्रिजमध्ये ठेवलेला आंबा खाण्यासाठी त्याने आईकडे हट्ट धरला होता. आईने त्यास काही वेळ थांबण्याचा सल्ला दिलेला असताना त्याची नजर घडय़ाळाकडे असताना त्याच्याकडून सातत्याने टिक।़टिक।़चाच उच्चार होत होता. यातूनच टिक।़टिक।़ वाजते डोक्यात… या गाण्याची निर्मिती झाल्याचे त्यांनी   सांगितले. गीतलेखनाकडे फारसे कोणी वळत नाही. मात्र, गीतलेखनातही स्वतःच्या कलांचा विस्तार करून करिअर करण्यासाठी खूप संधी आहेत. खऱया अर्थाने आपल्याला कोकणच्या लालमातीनेच कवी बनवले असून भविष्यात चांगला माणूस बनण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी नमूद केले.

Related posts: