|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » काजू उत्पादकांना दिलासा, 15 टक्के आयात शुल्कवाढ

काजू उत्पादकांना दिलासा, 15 टक्के आयात शुल्कवाढ 

प्रतिनिधी / रत्नागिरी

कोकणच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काजूवरील आयात शुल्क 30 टक्केपासून 45 टक्केपर्यंत नेण्याचे प्रस्तावित केले आहे. देशांतर्गत काजू उद्योगाच्या संरक्षणासाठी खारवलेले आणि भाजलेले अशा दोन्ही प्रकारच्या काजूवर सुमारे 15 टक्के आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. यामुळे देशांतर्गत काजूप्रक्रिया उदयोगाला चालना मिळणे अभिप्रेत आहे.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने सालासहित असणाऱया काजूच्या आयातीवर 10 टक्के आयात कर लावला होता. स्थानिक उत्पादकांना चांगला भाव मिळावा, या उद्देशाने संरक्षक कर रचना करण्यात आली होती. भारतामध्ये सध्या 16 ते 18 लाख मेट्रीक टन एवढी काजू प्रक्रिया क्षमता आहे. देशांतर्गत उत्पादन सुमारे 7.5 लाख मेट्रीक टन होत असते. म्हणजे प्रक्रिया क्षमतेच्या केवळ 50 टक्केहून कमी उत्पादन होत असते. प्रक्रिया कारखाने वर्षभर सुरु ठेवण्यासाठी अनेक उद्योजक ब्राझील व अन्य देशांतून सालासहित काजूंची आयात करत होते. आयात शुल्क वाढल्याने उत्पादकांना चांगला पैसा मिळू लागला असला तरी उद्योजकांना वर्षभर कारखाना चालवण्यासाठी स्थानिक काजू पुरेसा मिळत नव्हता तर आयात कर लावल्याने परदेशी काजू आणणे परवडत नव्हते.

यावर्षी सरकारने खाण्यास तयार असलेल्या खारवलेल्या, भाजलेल्या व अन्य स्वरुपातील काजूवर 30 वरुन 45 टक्के एवढे आयात शुल्क वाढवले आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत स्थानिक उत्पादकांनी तयार केलेला खाण्यास तयार असलेला खारा काजू अधिक भाव मिळवून देणार आहे. त्याचा फायदा उत्पादक व प्रक्रियादार अशा दोघांना मिळणार आहे. देशी काजू उद्योगाला बळकटी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे उत्पादकाला किमान 10 टक्के एवढी भाववाढ मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रक्रियादाराला बाजारपेठेत 10 टक्के जादा दराने काजू विकल्या जाण्याची अपेक्षा ठेवता येईल.

Related posts: